मुंबई सेंट्रल बसस्थानक परिसराचे लवकरच काँक्रिटीकरण सुरू

20 Dec 2024 12:45:26
Bus Stand

मुंबई : एस .टी. महामंडळाच्या मुंबई सेंट्रल ( Mumbai Central ) बसस्थानक परिसराचे कॉक्रीटीकरण करण्याचे काम २३ डिसेंबर पासून सुरू होणार असून, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई सेंट्रल बसस्थानकातुन सुटणाऱ्या ‍ बाहेरील आगाराच्या बसेसच्या फेऱ्या २३ डिसेंबर पासून टप्प्याटप्प्याने पुढील दोन महिन्यासाठी परळ, दादर व कुर्ला नेहरूनगर बसस्थानकातून सोडण्यात येणार आहेत. तथापि, मुंबई आगाराच्या फेऱ्या याच बसस्थानकातून सोडण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहकार्याने एसटीच्या राज्यभरातील १८३ बसस्थानकांच्या परिसराचे कॉक्रीटीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे . त्यासाठी सुमारे ६०० कोटी रुपये एमआयडीसी मार्फत खर्च करण्यात येणार आहेत. अनेक बसस्थानक परिसराचे काम सध्या प्रगतीपथावर असून त्या अंतर्गत मुंबई सेंट्रल येथील बसस्थानक परिसराचे काँक्रिटीकरण लवकरच सुरू होणार आहे. सुमारे १९०० चौरस मीटर इतक्या परिसराचे पूर्ण कॉक्रीटीकरण करण्यात येणार असून त्यासाठी १ कोटी ६४ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर बस स्थानक परिसरात खड्डे पडणे, पाणी साचणे, धुळ उडणे अशा समस्यांना कायमस्वरूपी तिलांजली मिळणार आहे.

तथापि, राज्यभरातून बाहेरील आगाराच्या सुमारे १५५ बस फेऱ्या मुंबई सेंट्रल येथे दिवसभरात येतात. त्यातून शकडो प्रवासी मुंबई सेंट्रल बसस्थानक परिसरामध्ये उतरत असतात. काँक्रिटीकरणच्या कामामुळे त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी या फेऱ्या जवळच्या परळ, दादर व कुर्ला नेहरूनगर बस स्थानकामध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर पूर्वीप्रमाणे या सर्व फेऱ्या मुंबई बसस्थानकातून सुरू राहतील अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आले आहे.

Powered By Sangraha 9.0