राजभवन येथे नागालँड व आसाम ‘राज्य स्थापना दिवस’ साजरा

02 Dec 2024 14:36:05
Rajyapal

मुंबई : “आपल्या राज्य स्थापनेपासून नागालँड व आसाम या राज्यांनी शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मिती व पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. दोन्ही राज्यांना निसर्ग संपदेचे वरदान लाभले आहे. देशातील राज्ये समजून घेण्यासाठी त्या-त्या राज्यांना प्रत्यक्ष भेट दिली पाहिजे. तसेच तेथील संस्कृती लोकांमध्ये राहून समजून घेतली पाहिजे. नागालँड व आसाम राज्यांना भेट देऊन तेथील लोकांशी संवाद वाढवल्यास राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होईल. यास्तव नागरिकांनी उभय राज्यांना भेट द्यावी,” असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन ( Rajbhavan ) यांनी रविवार, दि, १ डिसेंबर रोजी केले.

‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा भाग म्हणून महाराष्ट्र राजभवन येथे राज्यपालांच्या उपस्थितीत नागालँड दि. १ डिसेंबर व आसाम दि. २ डिसेंबर रोजी ‘राज्य स्थापना दिवस’ संयुक्तरित्या रविवार, दि. १ डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राजभवनतर्फे एसएनडीटी महिला विद्यापीठ व ‘ईश्वरपूरम पुणे’ या उत्तर-पूर्व राज्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षण व सक्षमीकरणासाठी कार्य करणार्‍या संस्थेच्या सहयोगाने करण्यात आले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा. उज्वला चक्रदेव, प्रकुलगुरु रुबी ओझा, ईश्वरपूरम संस्थेचे अध्यक्ष विनीत कुबेर, संस्थापक सदस्य प्रशांत जोशी यांसह उपस्थित विद्यार्थी व कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

Powered By Sangraha 9.0