मुंबई : फेंगल हे चक्रीवादळ सध्या भारताच्या दक्षिण किनारपट्टीजवळ घोंघावतं आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या 'फेंगल' वादळामुळे केरळ राज्याला पावसाचा अलर्ट देण्यात आला. तसेच या वादळामुळे महाराष्ट्रातील काही भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून २ डिसेंबर रोजी पावसाची शक्यता ( Rain Alert ) आहे.
फेंगल या चक्रीवादळामुळे वातावरणावर परिणाम झाला आहे. फेंगल चक्रीवादळाचा तमिळनाडूसह दक्षिणेतील राज्यांना फटका बसला असून कमी दाबाचा पट्टा आता वायव्येकडे सरकत आहे. भारतीय हवामान केंद्राच्या प्रादेशिक केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार, वादळामुळे केरळ राज्याला पावसाचा अलर्ट देण्यात आला असून या वादळाचा महाराष्ट्रातही फटका बसणार आहे. राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र राज्यात २ डिसेंबर रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग परिसरात मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच जालना जिल्ह्यात ३ डिसेंबरला पाऊस होण्याची शक्यता आहे. फेंगल हे चक्रीवादळ येत्या २४ तासात आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या ‘फेंगल’ चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातही पाहायला मिळणार असल्याचा अंदाज आहे. पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली जिल्ह्यांतही हलक्या पावसाचा अंदाज आहे. हवामान खात्याने याबाबतचा अलर्ट दिला आहे.