‘फेंगल’ चक्रीवादळामुळे विक्रमी पावसाची नोंद

02 Dec 2024 11:56:26
Fengal Cyclone

चेन्नई : बंगालच्या उपसागरातून उगम पावलेले ‘फेंगल’ चक्रीवादळाचे ( Fengal Cyclone ) पुद्दुचेरीसह तामिळनाडूत रौद्र रूप धारण केले. पुद्दुचेरीत रविवार, दि. १ डिसेंबर रोजी गेल्या तीन दशकांतील विक्रमी पावसाची नोंद झाली. तसेच, शेजारच्या तामिळनाडूमधील विल्लुपुरमलाही अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झाले असून चेन्नईत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. पुद्दुचेरी आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकण्यापूर्वी ‘फेंगल’ चक्रीवादळ कुड्डालोरच्या उत्तरेस अंदाजे ३० किलोमीटर आणि विल्लुपुरमच्या पूर्वेला ४० किलोमीटर अंतरावर सहा तासांसाठी स्थिर झाले होते. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ’पहाटे ५ वाजून ३० मिनिटांपर्यंत चक्रीवादळाने आपली जागा बदलली नाही, ते चेन्नईच्या दक्षिण-नैऋत्य १२० किलोमीटर अंतरावर स्थिर राहिले. त्यानंतर पुढील सहा तासांत हे चक्रीवादळ तमिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या उत्तरेकडील किनारपट्टीवरून हळूहळू पश्चिमेकडे सरकले. चेन्नईत मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. तसेच, पुद्दुचेरीमध्येही सामान्य जनजीवन विस्कळीत झाले होते. या केंद्रशासित प्रदेशात ४६ सेमी पाऊस पडला होता, जो ३१ ऑक्टोबर २००४ रोजी नोंदवलेल्या २१ सेंटीमीटरच्या पूर्वीच्या सर्वोत्तम पावसापेक्षा अधिक होता. चक्रीवादळाच्या तडाख्यात ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. शनिवारी रात्री ११ वाजल्यापासून बहुतांश भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. दरम्यान, कृष्णा नगरसह पुद्दुचेरीमधील तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून सुमारे २०० लोकांना वाचवण्यात आले. तसेच चेन्नई शहरातील अनेक उड्डाणांवरही परिणाम झाला आहे. सायंकाळी ७ वाजेपर्यंत विमानतळ बंद ठेवण्यात आले होते. अनेक रेल्वेगाड्याही नियोजित वेळेपासून उशिराने धावत होत्या. दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी परिस्थीतीचा आढावा घेतला.

Powered By Sangraha 9.0