नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या ( Supreme Court ) कॉलेजियमने मंगळवारी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.के. यादव यांनी नुकत्याच केलेल्या भाषणाबद्दल ताकीद दिली.
सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती सूर्यकांत, भुषण गवई, न्या. हृषिकेश रॉय आणि न्या. ए. एस. ओक यांचा समावेश असलेल्या कॉलेजियमने न्यायाधीशांना सल्ला दिला आणि कार्यालयाची प्रतिष्ठा राखण्यास सांगितले.
य़ावेळी न्यायमूर्ती यादव म्हणाले की, वादाला खतपाणी घालण्यासाठी माध्यमांनी त्यांच्या भाषणातील कोट निवडकपणे उद्धृत केले. मात्र, कॉलेजियमने त्यांच्या स्पष्टीकरणाशी सहमती दर्शवली नाही. कॉलेजियममने त्यांना न्यायालयाच्या आत आणि बाहेर त्याच्या वागणुकीबद्दल सावध राहण्यास सांगितले. न्यायाधीशांनी केलेले प्रत्येक विधान कार्यालयाच्या प्रतिष्ठेला धरून असले पाहिजे जेणेकरून लोकांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास असेल, असाही सल्ला न्या. यादव यांना देण्यात आला आहे.