विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी महायुतीकडून राम शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल

18 Dec 2024 13:04:48
 
ran shinde
 
नागपूर : (Ram Shinde) महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी राम शिंदे यांनी बुधवार दि. १८ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी अर्ज भरला आहे. तसेच याप्रसंगी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांतदादा पाटील, उदय सामंत, जयकुमार रावल आदी उपस्थित होते.
 
 
 
विधान परिषदेचे कामकाज सुरू होताच डॉ. नीलम गोर्‍हे यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या आदेशानुसार सभापतिपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला होता. रामराजे नाईक-निंबाळकर यांची ७ जुलै २०२२ रोजी सदस्यत्वाची मुदत संपल्यापासून विधान परिषदेचे सभापतीपद रिक्त होते. त्यामुळे राज्यपालांनी महाराष्ट्र विधान परिषद नियमातील नियमांमधील तरतुदीला अनुसरून सभापती निवडणुकीसाठी १९ डिसेंबर हा दिवस निश्चित केला असल्याचे डॉ. नीलम गोर्‍हे यांनी सांगितले.
 
राम शिंदेंनी ट्विट करत मानले आभार
 
“महाराष्ट्र विधान परिषद सभापती निवडणुकीसाठी माझी उमेदवारी घोषित केल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, त्याचबरोबर देशाचे गृहमंत्री अमित शाह, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, भारतीय जनता पार्टीचे राज्याचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, एनडीएचे आणि महायुतीचे आणि सर्व नेते यांचे मी मनापासून आभार मानतो. उद्या सकाळी विधान भवन नागपूर येथे १० वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे”, असे राम शिंदे यांनी म्हटलं आहे.
  
 
Powered By Sangraha 9.0