मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांचे अभिनंदन

18 Dec 2024 18:52:30
CM Fadanvis and Rasal

नागपूर : साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ज्येष्ठ समीक्षक डॉ सुधीर रसाळ यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( CM Fadanvis ) यांनी अभिनंदन केले आहे. या पुरस्कारामुळे मराठी समीक्षा क्षेत्रातील एका व्रतस्थ साहित्यिकाचा सन्मान होत आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे.

भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या राष्ट्रीय साहित्य संस्थेच्यावतीने आज साहित्य अकादमी पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यात डॉ रसाळ यांच्या विंदांचे गद्यरूप या समीक्षात्मक पुस्तकाला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, डॉ रसाळ यांचे मराठी साहित्य विश्वातील योगदान अमुल्य असे आहे. मराठी भाषेचे अध्यापन, संशोधन, संपादन आणि समीक्षा असा त्यांचा चौफेर विहार राहीला आहे. विशेषतः त्यांचे मराठी काव्यविषयक संशोधनात्मक लेखन मौलिक असे आहे. समीक्षेतून कठीण विषय सहज-सुलभपणे समजावून देणारी त्यांची शैली नवोदितांना आश्वासक वाटते, यातच त्यांचे मोठेपण आहे. मराठी भाषा जतन, संवर्धन तसेच साहित्य विषयक चळवळीतील संस्था, समित्यांवरही डॉ रसाळ सक्रीयपणे कार्यरत आहेत. त्यांच्या समीक्षात्मक लेखनाला राष्ट्रीयस्तरावर मिळालेली ही दाद नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. डॉ. रसाळ आजही तितक्याच तडफेने लेखन, संशोधनात कार्यरत आहेत. त्यांच्या हातून यापुढेही मराठी साहित्याची अशीच अखंडित सेवा घडत राहो. त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो या शुभेच्छांसह मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी डॉ. रसाळ यांचे अभिनंदन केले आहे.

Powered By Sangraha 9.0