ओटावा : जस्टिन ट्रूडो यांच्या नेतृत्वात कॅनडाची अर्थव्यवस्था ढासळल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.याच पार्श्वभूमीवर कॅनडाच्या उपपंतप्रधान तथा अर्थमंत्री क्रिस्टिया फ्रीलँड यांनी सोमवार दिनांक १६ डिसेंबर रोजी अचानक राजीनामा दिला. पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्याशी धोरणात्मक बाबींवर मतभेद झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला असल्याचे बोलले जात आहे. ट्रूडो यांच्या नेतृत्वात क्रिस्टिया संसदेत ढासळत्या अर्थव्यवस्थेबद्दलचा अहवाल मांडणार होत्या, परंतु त्याच्या काही तास आधीच त्यांनी राजीनामा दिला आहे. क्रिस्टिया फ्रीलँड या ट्रूडो यांचा वारसा पुढे नेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती, मात्र राजीनामा दिल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
आपला देश सध्या एका मोठ्या आर्थिक संकटातून जात असून, येत्या काळात अमेरीकेच्या करप्रणाली मुळे आपल्याला मोठा फटका बसणार आहे. ट्रम्प यांच्या धोरणांचा गांर्भीयाने विचार करायाला हवा असं फ्रीलँड यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे. त्याच बरोबर ट्रूडो यांच्या आर्थीक धोरणांवर सुद्धा फ्रीलँड यांनी टीका केली आहे. ट्रूडो यांनी सरकारी योजनांच्या खर्चासाठी तिजोरी उघडी केल्यामुळे वाढत्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर कॅनडाला हे परवडणारे नाही, असे त्या म्हणाल्या. राजकीय दृष्ट्या दोघांमध्ये एकवाक्यता नसल्याचे देखील समोर आले आहे. फ्रीलँड यांना अर्थखात्यातून मुक्त करून दुसऱ्या विभागाची जबाबदारी देण्यात येणार होती. परंतु मंत्रिमंडळातून बाहेर पडणे हाच व्यवहार्य मार्ग असेल असे मत फ्रीलँड यांनी आपल्या पत्रात व्यक्त केले.
" ट्रूडो यांनी राजीनामा द्यावा"
जस्टिन ट्रूडो यांच्या काळात कट्टरपंथीय खलिस्तानी संघटनांना बळ मिळाले, भारत आणि कॅनडा यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला. त्याच बरोबर अर्थव्यवस्थेचे नवीनच संकट ओढावले आहे. यामुळेच आता पंतप्रधान ट्रुडो यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.न्यू डोमोक्रेटिक पार्टीचे (NDP) नेते जगमीत सिंग यांनी ट्रुडो यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच संसदेच्या २३ खासदारांनी त्यांच्या राजीनाम्यासाठी पत्र लिहिले आहे.