पुणे : स्वानंद चॅरिटेबल ट्रस्ट, डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मी सावरकर’ या अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे यंदाचे हे आठवे वर्ष आहे. व्याख्यान, संगीतमय सावरकर, काव्य निरूपण, नाट्यवाचन, वाद-विवाद कौशल्ये अशा विविध स्वरूपात ही स्पर्धा होणार आहे. व्याख्यानासाठी ‘अखंड भारत’, ‘हिंदू समाज फोडण्याची आजची षड्यंत्रे’, हलाल प्रमाणपत्र : हिंदूंचा काय संबंध’, ‘सावरकरांच्या विचारांमधला हिंदू’, ‘सावरकरांचे ‘इंडिया हाऊस’ पर्व’, ‘सावरकर सिनेमामधील मला आवडलेला प्रसंग’ इत्यादी विषय आहेत. ‘संगीतमय सावरकर’ या स्पर्धेसाठी स्पर्धकांना सावरकरांनी रचलेल्या कोणत्याही एका कवितेचे नव्या चालीत/ढंगात सादरीकरण व्हिडिओ स्वरूपात पाठवायचे आहे. ‘काव्य निरूपण’ या स्पर्धेसाठी सावरकर रचित ‘गणेश प्रार्थना’ याचे निरूपण सादर करायचे आहे. ‘नाट्यवाचन’ या स्पर्धेसाठी सावरकर लिखित कोणत्याही नाटकातील प्रवेशाचे वाचन ऑडिओ स्वरूपात पाठवायचे आहे. वाद-विवाद स्पर्धा समान नागरी कायदा हवा की नको या विषयावर होणार आहे. या स्पर्धेसाठी रेकॉर्डिंग पाठवायची अंतिम तारीख ३१ डिसेंबर आहे. महाविजेत्यास अंदमान यात्रा आणि स्वा. सावरकर आत्मार्पणदिनानिमित्त अंदमान येथे बोलण्याची संधी मिळणार आहे. अधिक माहितीसाठी ८९५६६४२७३६ या क्रमांकावर संपर्क साधावा.