एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या जेएच मिनी ऑडिटोरियममध्ये राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

16 Dec 2024 14:46:47
SNDT

मुंबई : एस.एन.डी.टी. ( SNDT ) महिला विद्यापीठाच्या मानवी विकास विभागाने ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण' (एनईपी-२०२०) अंतर्गत पूर्वप्राथमिक बालकांचा सर्वांगीण विकास’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. ही परिषद १९ व २० डिसेंबर २०२४ रोजी संपन्न होणार आहे.

या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये पूर्वप्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी दिलेल्या शिफारसींवर विचारमंथन करणे. प्रारंभिक बाल शिक्षण आणि मानवी विकास क्षेत्रातील तज्ज्ञ आणि संशोधक या परिषदेचे प्रमुख वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत.

या परिषदेत अभ्यासक्रम आणि अध्यापन पद्धतीतील नवोपक्रम, पूर्वप्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, पालक व समुदाय सहभाग, गुणवत्ता तपासणी आणि जीवन कौशल्ये व मूल्ये या विषयांवर चर्चा होणार आहे. तसेच पूर्वप्राथमिक शिक्षणासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यावर भर दिला जाईल.

या परिषदेत संशोधक, शिक्षक, अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षक तसेच सरकारी व खाजगी शाळांमधील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. परिषदेच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाचे माननीय आयुक्त श्री. कैलास पगारे उपस्थित राहणार असून, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव अध्यक्षस्थानी असतील.

Powered By Sangraha 9.0