नागपूर विधानभवनाचा होणार विस्तार

16 Dec 2024 18:22:48
Nagpur Vidhanbhavan

नागपूर : नागपूर विधानभवनाला ( Vidhanbhavan ) नवा साज मिळण्यासह या वास्तूचा आता विस्तार होणार आहे. त्यासाठी नजीकच्या शासकीय मुद्रणालयाची जागा (९ हजार ६७० चौ.मी.) अधिग्रहित करण्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी आणि विद्यमान हिवाळी अधिवेशनामध्ये यासंदर्भातील निर्णय घेण्यात यावा, असे निदेश विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सोमवार, दि. १६ डिसेंबर रोजी दिले.

विधान भवन नागपूर येथे मध्यवर्ती सभागृहाची सुविधा नाही. त्यामुळे राज्यपालांचे अभिभाषण आणि दोन्ही सभागृहांच्या सदस्यांसाठी एकत्रितरित्या आयोजित करावयाच्या कार्यक्रमांमध्ये अडचणी निर्माण होतात. या सर्व बाबी विचारात घेता विधानसभा अध्यक्षांनी अतिरिक्त जमीन विधानमंडळाकडे हस्तांतरीत होण्यासाठी कार्यवाही सुरू केली होती. त्यासंदर्भात पुढील कार्यवाही करण्यासाठी सोमवारी उद्योग विभागाचे प्रधान सचिव, विभागीय आयुक्त नागपूर, तसेच जिल्हाधिकारी नागपूर यांची बैठक विधानसभा अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यात नार्वेकर यांनी हे निर्देश दिले.

Powered By Sangraha 9.0