रत्नागिरीत दरवर्षी ‘सागर महोत्सवा’च्या निमित्ताने समुद्रप्रेमींचा मेळा भरतो (ratnagiri sagar mahotsav). या मेळ्यात समुद्राविषयी, त्यातील जैवविविधतेविषयी आणि त्याच्या संवर्धनाविषयीच्या माहितीची देवाणघेवाण होते (ratnagiri sagar mahotsav). यावर्षीदेखील हा मेळा भरणार आहे जानेवारीत, जाणून घेऊया त्याविषयी...(ratnagiri sagar mahotsav)
मानवी उत्क्रांतीत सागरांचे महत्त्व अपार आहे. आधुनिक अर्थव्यवस्था आणि मानवी स्वास्थ्य यातही सागराचे मोठे योगदान आहे. पण या गोष्टींची जाणीव सर्वसाधारण माणसांना असतेच असे नाही. किंबहुना, समुद्रापासून दूर राहणार्या नागरिकांना तर याची माहितीसुद्धा नसते. सागरी परिसंस्था आणि त्याचे महत्त्व सामान्य नागरिकांपर्यंत नेणे आणि त्यातून संवर्धनकार्याची प्रेरणा देणे, याच ध्येयातून तीन वर्षांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात ’आसमंत बेनेवोलन्स फाऊंडेशन’कडून ’सागर महोत्सवा’ची सुरुवात करण्यात आली. रत्नागिरीमध्ये ‘आसमंत’ने विकसित केलेली शहरी जंगले हे पक्ष्यांच्या जवळजवळ ५० प्रजाती, २० फुलपाखरांच्या प्रजाती तसेच खूप मोठ्या संख्येने कीटक, सरडे, घोरपडी व अन्य सरपटणार्या प्राण्यांसाठीचे घर बनले आहे. हे कार्य ‘संयुक्त राष्ट्र परिषदे’ने निश्चित केलेल्या उद्दिष्टांपैकी शाश्वत विकास उद्दिष्ट क्र. ४, १५ आणि १६ शी संलग्न आहेत. ‘संयुक्त राष्ट्र परिषदे’ने शाश्वत विकासासाठी निश्चित केलेल्या १७ उद्दिष्टांपैकी शाश्वत विकास ध्येय क्र. १४ हे ‘शाश्वत विकासासाठी महासागर, समुद्र आणि सागरी संसाधनांचे संरक्षण आणि शाश्वत वापर करणे’ आहे. मानवाच्या अस्तित्वासाठी आणि पृथ्वीवरील जीवनासाठी निरोगी महासागर आणि समुद्र आवश्यक आहेत. याच ध्येयाला अनुसरून ‘आसमंत’ गेली दोन वर्षे ‘सागर महोत्सवा’चे आयोजन करत आहे. गेल्या दोन वर्षांत सुमारे दहा हजार लोकांपर्यंत हा महोत्सव पोहोचला. त्यातून अनेक शाळा-महाविद्यालयांनी प्रेरणा घेऊन कामे हाती घेतली. यातच महोत्सवाचे यश आहे.
भारतासाठी निळी (ब्लू) अर्थव्यवस्था म्हणजे महासागर आणि सागरी परिसंस्थांशी संबंधित अनेक आर्थिक संधी, ज्या उपजीविका निर्माण करण्यात आणि टिकवून ठेवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. लाखो नोकर्या उपलब्ध करून देणारी आणि आणखी अनेक संधी निर्माण करणारी काही प्रमुख क्षेत्रे म्हणजे मत्स्यपालन, शिपिंग, पर्यटन, खोल समुद्रातील खाणकाम, ऑफशोअर ऊर्जा संसाधने, सागरी संशोधन, महासागर संवर्धन आणि महासागर विज्ञान यांसह महासागर आधारित क्षेत्रे. भारतासाठी निळी अर्थव्यवस्था म्हणजे आर्थिक संधींचा एक विशाल महासागर जो उपजीविका निर्माण करण्यात आणि टिकवून ठेवण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. १२ प्रमुख आणि २०० लहान बंदरांसह नऊ किनारी राज्ये, चार केंद्रशासित प्रदेशामध्ये पसरलेल्या ७ हजार, ५०० किमी लांबीच्या किनारपट्टीसह, भारताची निळी अर्थव्यवस्था देशाच्या ९५ टक्के व्यवसायाला वाहतुकीद्वारे समर्थन देते आणि त्यात मोठे योगदान देते. त्याचे सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) अंदाजे चार टक्के योगदान आहे. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा मत्स्यउत्पादक आणि मत्स्यपालन मासे उत्पादक देश आहे. पुढील काही दशके ही निळी अर्थव्यवस्था आपल्याला तारून नेईल.
या सागराशी मैत्री साधत ’आसमंत’ त्याचे जतन, संवर्धन करण्यासाठी गेल्या दोन वर्षांहून अधिक प्रयत्न करत आहे. सागर आणि त्याभोवती असलेल्या परिसंस्थेचे जतन किती महत्त्वाचे आहे, हे वरील आकडेवारीवरून लक्षात येईलच. २०२५ सालचा ‘सागर महोत्सव’ दि. ९ जानेवारी ते दि. १२ जानेवारी दरम्यान रत्नागिरीमध्ये साजरा होणार आहे. या महोत्सवासाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालय-रत्नागिरी, मत्स्य महाविद्यालय-रत्नागिरी, ‘राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था-गोवा’, ‘गोखले इन्स्टिट्यूट’, ‘सेंटर फॉर ससस्टेनेबल डेव्हलपमेंट-पुणे’, ‘इकॉलॉजिकल सोसायटी-पुणे’, ‘कोस्टल कॉन्झर्वेशन फाऊंडेशन-मुंबई’ यांचा तांत्रिक सहभाग मिळाला आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी डॉ. के. काथीरेसन यांचे मुख्य भाषण होईल. त्यानंतर श्रीनिवास पेंडसे यांचे ‘महासागराचे आध्यात्मिक महत्त्व’ या विषयावर प्रवचन, ‘एनआयओ’चे शास्त्रज्ञ डॉ. डामरे यांचे ‘सागरी बुरशी’ आणि डॉ. नरसिंह ठाकूर यांचे व्याख्यान पार पडेल. ‘अरबी समुद्रातील चक्रीवादळे’ याविषयी डॉ. मेधा देशपांडे मार्गदर्शन करतील, तर हनुमंत हेडे हे ‘सागरी पर्यटन’ याविषयी व्याख्यान देतील. दि. १० जानेवारी रोजी सकाळी प्रदिप पाताडे आणि डॉ. अमृता भावे यांच्या मार्गदर्शनाखाली किनारी जैवविविधता दर्शन फेरी पार पडली. त्यानंतर प्रा. प्र. के. घाणेकर यांचे ‘सागरी किल्ला आणि जैवविविधता’ याविषयी भाषण होईल. ‘एनआयओ’चे डॉ. सुहास शेट्ये, प्राची हटकर आणि सतिश खाडे यांची व्याख्याने पार पडतील. दि. ११ जानेवारी रोजी डॉ. विशाल भावे यांचे ‘समुद्री गोगलगायी’ आणि डॉ. सायली नेरुरकर यांचे ‘सागरी जैवविविधता’ या विषयावरील व्याख्यान पार पडेल. त्यानंतर अमिता देशपांडे आणि पूजा साठ्ये यांची व्याख्याने होतील. दि. १२ जानेवारी रोजी डॉ. हेमंत कारखानीस यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत कांदळवन सफारी घेण्यात येईल. रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या सभागृहात व्याख्याने पार पडतील. ‘आसमंत’च्या सागराप्रति जिव्हाळ्याच्या या कार्यक्रमाला पाठिंब्याची, मार्गदर्शनाची गरज आहे. सर्वांनी यात सामील होऊन ‘आसमंत’चा ‘सागर महोत्सव’ राष्ट्रीय दर्जाचा करूया.