मुंबई : तब्बल ३३ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर नागपूरच्या राजभवनात लगबग पहायला मिळाली. मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या ( Mahayuti ) 'मेगा' शपथविधीसोहळ्यात तब्बल ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यात ३३ कॅबिनेट आणि ६ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवार, दि. १५ डिसेंबर रोजी नागपूर येथे पार पडला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी नव्या मंत्र्यांना शपथ दिली. भाजपच्या वतीने चंद्रशेखर बावनकुळे यांनी पहिली शपथ घेतली. त्यानंतर अनुक्रमे राधाकृष्ण विखे पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, गणेश नाईक यांच्यासह ३३ कॅबिनेट, तर ६ राज्यमंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे १९९१ नंतर पहिल्यांदाच नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला.
भाजपच्या वतीने १६ कॅबिनेट, तर ३ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. शिवसेना ९ कॅबिनेट आणि २ राज्यमंत्री, तर राष्ट्रवादीतर्फे ८ कॅबिनेट आणि एका राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. गेल्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या १२ जणांना यावेळेस पुन्हा संधी देण्यात आलेली नाही. त्यात ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, विजयकुमार गावित, रवींद्र चव्हाण, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, सुरेश खाडे, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, धर्मराव आत्राम, संजय बनसोडे, अनिल पाटील यांचा समावेश आहे.
महायुती सरकारचे मंत्रिमंडळ
भाजप (कॅबिनेट मंत्री) : १) चंद्रशेखर बावनकुळे २) राधाकृष्ण विखे पाटील ३) चंद्रकांत पाटील ४) गिरीश महाजन ५) गणेश नाईक ६) मंगल प्रभात लोढा ७) जयकुमार रावल ८) पंकजा मुंडे ९) अतुल सावे १०) अशोक उईके ११) आशिष शेलार १२) शिवेंद्रसिंहराजे भोसले १३) जयकुमार गोरे १४) संजय सावकारे १५) नितेश राणे १६) आकाश फुंडकर
भाजप (राज्यमंत्री) : १) माधुरी मिसाळ - भाजप २) मेघना बोर्डीकर - भाजप ३) पंकज भोयर - भाजप
शिवसेना (कॅबिनेट मंत्री) : १) गुलाबराव पाटील २) दादा भुसे ३) संजय राठोड ४) उदय सामंत ५) शंभूराज देसाई ६) संजय शिरसाट ७) प्रताप सरनाईक ८) भरत गोगावले ९) प्रकाश आबिटकर
शिवसेना (राज्यमंत्री) : १) आशिष जैस्वाल - शिवसेना २) योगेश कदम - शिवसेना
राष्ट्रवादी (कॅबिनेट मंत्री) : १) हसन मुश्रीफ २) धनंजय मुंडे ३) दत्तात्रेय भरणे ४) अदिती तटकरे ५) माणिकराव कोकाटे ६) नरहरी झिरवाळ ७) मकरंद पाटील ८) बाबासाहेब पाटील
राष्ट्रवादी (राज्यमंत्री) : इंद्रनील नाईक - राष्ट्रवादी