मुंबईत परतली गिधाडे; शहरातील आकाशात दुर्मीळ युरेशियन गिधाडाच्या घिरट्या

14 Dec 2024 09:31:58
eurasian griffon vulture
 
 
 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबईच्या आकाशात दुर्मीळ युरेशियन ग्रिफाॅन प्रजातीची स्थलांतरी गिधाडे विहार करत असल्याचे निदर्शनास आले आहे. (eurasian griffon vulture). शुक्रवार दि. १३ डिसेंबर रोजी शिवडीमध्ये या गिधाडाचे दर्शन झाले असून वडाळ्यामध्ये जखमी अवस्थेत सापडलेल्या गिधाडाचा बचाव करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात देखील मुंबईच्या समुद्रामधील जवाहर द्वीप बेटावरुन युरेशियन गिधाडाचा बचाव करण्यात आला होता. त्यामुळे या गिधाडांनी मुंबईत स्थलांतर केल्याची शक्यता आहे. (eurasian griffon vulture)

शुक्रवार दि. १३ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास वडाळ्यातील मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण केंद्राच्या आवारात युरेशियन ग्रिफाॅन गिधाड जखमी अवस्थेत सापडले. केंद्रातील कर्मचाऱ्यांनी लागलीच याची माहिती राॅ या वन्यजीव बचाव कार्यकर्त्यांना दिली. कार्यकर्त्यांनी या गिधाडाचा बचाव केला असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत. शुक्रवारी सायंकाळी शिवडीतील सेलेस्टील स्पेसमध्ये राहणारे वन्यजीवप्रेमी कबीर आॅबेराॅय यांना आपल्या घराच्या बाल्कनीसमोरुन गिधाड उडताना दिसले. त्यांनी लागलीच या गिधाडाचे छायाचित्र टिपले आणि कियान मूगासेठ यांनी हे गिधाड युरेशियन गिफाॅन प्रजातीचे असण्यावर शिक्कामोर्तब केले. गेल्या आठवड्यात देखील जवाहर द्वीपावर युरेशियन ग्रिफॉन प्रजातीच्या गिधाडाचा बचाव करण्यात आला होता. त्यामुळे या गिधाडांनी मुंबईत स्थलांतर केल्याची शक्यता आहे.

युरेशियन ग्रिफाॅन गिधाड ही हिवाळ्यात युरोपमधून भारतात स्थलांतर करतात. ही गिधाडे प्रामुख्याने मध्य भारतापर्यंतच्या प्रदेशात स्थलांतर करतात. त्याखालच्या प्रदेशांमध्ये क्वचितच दिसतात. मुंबईत आढळत असलेली गिधाडेही स्थलांतरादरम्यानच याठिकाणी आली असावीत. पश्चिम घाट आणि कोकण परिसरात रायगड आणि सिंधुदुर्गातील तिलारी प्रदेशात युरेशियन गिधाड स्थलांतर करुन येत असल्याच्या तुरळक नोंदी आहेत.
Powered By Sangraha 9.0