त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा।

    14-Dec-2024
Total Views |
 
DATTA JAYANTI
  
आज दत्त जयंती. महाराष्ट्रातील अनेक पूजनीय देवतांपैकी अनेकांचे आराध्य म्हणजे श्रीदत्त. चतुर्वेददर्शक चार श्वान आणि कामधेनू म्हणजेच गोमाता यांच्या सहवासात वावरणारे त्रिमुखी दत्त म्हणजे साक्षात ब्रह्म, विष्णू आणि महेश यांचे रुप. त्यामुळे दत्तात्रयांची पूजा केल्याने एकाचवेळी ब्रह्म, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो, असे मानले जाते. याच श्रीदेव दत्तांना वंदन म्हणून दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात आपण दत्त जयंती साजरी करतो. तेव्हा, आज दत्त जयंतीच्या निमित्ताने मुंबई आणि ठाण्यातील काही दत्त मंदिरांचा हा थोडक्यात परिचय...
 
दत्तात्रयांचा वास असलेले वाकोल्यातील श्री गुरूदेव दत्त मंदिर
 
मुंबईतील प्रसिद्ध दत्त मंदिरांपैकी एक म्हणजे सांताक्रूझ, पूर्व वाकोला येथील ‘श्री गुरूदेव दत्त मंदिर’. या मंदिराची स्थापना इ. स. १९२४ मध्ये झाली. १९२४ साली उत्तरेकडील एका साधूंनी दत्त मंदिर व औदुंबर वृक्ष असलेल्या स्थानास भेट दिली होती. आज दत्त मंदिर असलेल्या ठिकाणी पूर्वी फक्त औदुंबर वृक्ष होता. त्या वृक्षाकडे आणि एकंदरीत त्या ठिकाणाकडे पाहून ही जागा अत्यंत पवित्र असून या ठिकाणी श्री दत्तात्रयांचा वास आहे, असा साक्षात्कार त्या साधूंना झाला. त्या ठिकाणी दत्त मंदिर उभारावे, अशी साधूंची इच्छा झाली. त्या साधूंच्या इच्छेनुसार त्या परिसरात राहणार्‍या नाडकर्णी, देसाई व बालवल्ले या तीन कुटुंबांनी इतर स्थानिकांची मदत घेऊन वाकोला येथील हे दत्त मंदिर उभारण्यात आले. या मंदिरात बाल स्वरुपातली पद्मासनातली दत्तमूर्ती, गणेशमूर्ती व हात जोडलेली हनुमंताची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली. जयपूर येथे तयार झालेल्या या मूर्त्या सांताक्रूझ स्थानकापासून मिरवणूक काढून मंदिरात स्थापित करण्यात आल्या. गुरूपौर्णिमा व दत्त जयंती हे उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. या दिवसांमध्ये या मंदिरात अन्नदान केले जाते. श्री गुरूचरित्र, श्रीपादश्रीवल्लभ चारितामृत व गुरुलीलामृत पारायणाची सोय असते. या मंदिरात अनेक भक्त रोज दर्शनासाठी येतात.
 
आध्यात्मिक आणि कलेचे क्षेत्र म्हणून प्रसिद्ध ठाण्यातील विठ्ठल सायन्ना दत्त मंदिर
 
ठाण्यातील प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी एक म्हणजे दमाणी इस्टेट भागातील श्री विठ्ठल सायन्ना दत्त मंदिर आहे. हे मंदिर ११० वर्षे जुने आहे. तत्कालीन प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि दानशूर व्यक्तिमत्त्व विठ्ठल सायन्ना यादव यांनी त्यांचे आध्यात्मिक गुरू नंद महाराज यांच्या सांगण्यानुसार १९१२ मध्ये त्यांनी या मंदिराची उभारणी केली. श्री विठ्ठल सायन्ना मंदिर हे ठाणेकरांचे श्रद्धास्थान आहे. शिर्डीचे साईबाबा, प. पू. कलावतीदेवी, राष्ट्रसंत तुकोडी महाराज, गाडगे महाराज आदी संतांनी भेटी दिल्या आहेत. तसेच, बालगंधर्व, सवाई गंधर्व आदी कलाकारांचे कार्यक्रम येथे होत असल्याने हे मंदिर तत्कालीन आध्यात्मिक आणि कलेचे क्षेत्र म्हणून ओळखले जायचे. १९८६ मध्ये या मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली. रोज मोठ्या प्रमाणात भाविक या मंदिराला भेट देतात. या मंदिरात सर्व सण उत्साहात साजरे होतात. दत्त जयंतीच्या दिवशी येथे पूजा, हवन, अन्नदान असा मोठा कार्यक्रम असतो. गेली अनेक वर्षे येथील मंदिरामध्ये दत्त जयंतीला सनातन-निर्मित ग्रंथ आणि सात्विक उत्पादने यांचे प्रदर्शन भरवण्यात येते. अनेक वर्षांपासून या मंदिरात सनातन संस्थेच्यावतीने सत्संग घेण्यात येत आहे. विठ्ठल सायन्ना यादव यांची पाचवी पिढी मंदिराच्या परिसरात राहून या मंदिराची देखभाल करत आहे.
 
स्वातंत्र्यलढ्याशी नाते सांगणारे माहीममधील श्रीदत्त मंदिर
 
टाकनदास कटारिया मार्ग आणि वीर सावरकर मार्गाला जोडणार्‍या लगतच्या भूखंडावर हे दत्तांचे मंदिर आहे. १९३२ मध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, रत्नागिरीचे शिवभक्त सिद्धीपुरुष स्वामी पासलेकर महाराज आणि दानशूर भागोजी कीर यांच्या संकल्पनेतून हे मंदिर उभारले गेले. हे मंदिर तीनमजली असून याचे बांधकाम प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक शापुरजी पालनजी यांनी केले होते. या मंदिरातील मूर्तीच्या स्थापनेबाबत एक आख्यायिका सांगितली जाते, ती अशी- मूर्तीची स्थापना कुठे करायची, असा प्रश्न पडला, तेव्हा रत्नागिरीचे शिवभक्त सिद्धीपुरुष स्वामी पासलेकर महाराजांनी त्यांच्या गळ्यातील नाग मंदिरात सोडला. ज्या स्थानी नागदेवता जाऊन विराजमान झाली, त्याच स्थानी दत्त महाराजांच्या मूर्तीची विधिवत स्थापना करण्यात आली. धर्मकार्यासोबत देशकार्याच्या उपयोगी व्हावे, या विचारातून हे मंदिर उभारले गेले. खुद्द स्वातंत्र्यवीर सावरकर या मंदिरात अनेकदा येत असत. गेली ९१ वर्षे या मंदिरात दत्तजयंती, महाशिवरात्री आणि नागपंचमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. या उत्सवांच्या दिवशी भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. दररोज अनेक भाविक या मंदिरात दर्शन घेण्यासाठी येतात.
 
भाविकांचे आकर्षण असलेले कुर्ल्यातील श्री काळा दत्त मंदिर
 
दत्ताची मंदिरे अनेक ठिकाणी असतात, पण कुर्ला पश्चिम ‘काळा दत्त मंदिर’ हे भाविकांचे विशेष आकर्षण आहे. ९०च्या दशकात कुर्ला परिसरात अनेक गिरणी कामगार वास्तव्यास राहत होते. त्याकाळी स्वदेशी मिल जवळ असल्यामुळे गिरणी कामगार कुर्ल्यातील ताकियावार्ड परिसरात मोठ्या संख्येने राहत होते. याच भागात आजही अनेक जुनी मंदिरे आहेत. त्यातीलच एक गिरणी कामगार आणि स्थानिकांचे श्रद्धास्थान असलेले हे श्री काळा दत्त मंदिर. या मंदिराची स्थापना १९९२ साली झाली. काळा दत्त मंदिर हे संगमरवरी दगडापासून बनवलेले आहे. या मंदिराच्या मागच्या बाजूला औदुंबराचे झाड आहे. या झाडाखाली श्री काळा दत्त महाराजांची मूर्ती आहे. मंदिराच्या गाभार्‍यात काळ्या पाषाणात श्री दत्त महाराजांची मूर्ती आणि पादुका आहेत. तसेच, गाभार्‍यात एका बाजूस दगडी गणपती आणि हनुमानाची मूर्ती आहे. रोज सकाळी ६ वाजता या मंदिराचे प्रवेशद्वार भक्तांसाठी उघडले जाते. दत्तजयंतीच्या दिवशी श्री काळा दत्त मंदिरात दत्तगुरूंचा जन्मकाळ सोहळा तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ‘श्री काळा दत्त मंडळा‘कडून केले जाते. यावेळी सत्यनारायणाची महापूजा, काकड आरती, जन्मोत्सव सोहळा गिरणी कामगार आणि स्थानिकांच्या उपस्थितीत पार पडतो. दरवर्षी मुंबईतून हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात.
 
श्री विष्णू चैतन्य गणपत महाराजांनी उभारलेले भांडुपमधील दत्त मंदिर 
 
‘श्री विष्णू चैतन्य गणपत महाराज मंदिर ट्रस्ट’चे श्रीदत्त मंदिर. नाथपंथीय विष्णू चैतन्य गणपत महाराज यांनी या मंदिराची स्थापना केली. या मंदिराच्या ठिकाणी विष्णू चैतन्य गणपत महाराजांनी आपल्या आयुष्याचा बराचसा काळ घालवला. या ठिकाणी ते राहायचे, ध्यान करायचे त्यांचे भक्तही त्यांना भेटायला याच ठिकाणी यायचे. १९३४ साली महाराजांनी या मंदिराची स्थापना केली. याच ठिकाणी विष्णू चैतन्य गणपत महाराजांनी समाधीसुद्धा घेतली म्हणून हे त्यांचे समाधीस्थळ म्हणूनसुद्धा ओळखले जाते. महाराजांच्या दैनंदिन जीवनातील आणि नाथपंथातील अनेक लोकांशी संबंधित काही जुन्या वस्तूसुद्धा या मंदिरात ठेवलेल्या आहेत. दररोज अनेक भाविक या मंदिराला भेट देतात. दत्त जयंतीच्या दिवशी या मंदिरात मोठा उत्सव असतो.
 
 
 
दिपाली कानसे