नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठ येथे द साबरमती रिपोर्ट चित्रपटाच्या स्क्रीनिंगचे १२ डिसेंबर २०२४ रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी चित्रपटाच्या स्क्रींनिंगदरम्यान दगडफेक करण्यात आल्याची घटना आहे. याबाबत जेएनयूचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे अध्यक्ष राजेश्वर कांत दुबे यांनी सांगितले की, या घटनेत काही लोक जखमी झाले असून काही विद्यार्थ्यांनाही दुखापत झाली आहे.
त्यांनी सांगितले की, स्क्रीनिंग वेळी दगडफेक सुरू झाली असल्याने काही काळ सुरू असलेला चित्रपट मधूनच थांबवण्यात आला होता. मात्र नंतर पुन्हा सुरू करण्यात आल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात आता अखिल भारतीय विद्यार्थी परिषद दिल्लीने एक ट्विट केले असून त्यात नमूद केले की, गोध्राचे सत्य २० वर्षांपूर्वी त्यांना सहन होत नव्हते आणि आजही सहन केले जात नाही. जेएनयूमध्ये साबरमती स्क्रीनिंगवेळी व्यत्यय आणत गालबोट लावले असून पोस्टर्स फाडण्यात आले.
द साबरमती रिपोर्टच्या अहवालात गोध्रा प्रकरणाचे सत्य समोर आले आहे. यामध्ये विक्रांत मेसी नावाचा अभिनेता एका पत्रकाराच्या भूमिकेत असून साबरमती एक्स्प्रेसच्या कशापद्धतीने घातपात केला हे या चित्रपटाच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. तसेच कारसेवकांची हत्या कशाप्रकारे चतुराईने केली याची माहिती चित्रपटात देण्यात आली आहे.