हिंदूंमध्ये तर सगोत्र विवाहाला धार्मिक आणि सामाजिक मान्यता नाहीच. आपण याला धार्मिक अधिष्ठानाचे नाव देतो, परंपरेचे नाव देतो. पण, आता नुकतेच ब्रिटनच्या संसदेमध्ये कन्झर्वेटिव्ह पक्षाचा नेता रिचर्ड होल्डन यांने ब्रिटनमध्ये चुलत भावा बहिणींच्या विवाहावर बंदी आणण्याचा प्रस्ताव मांडला आहे. नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क तसेच अमेरिकेतील 24 राज्यांमध्ये चुलत भावाबहिणींच्या विवाहाला कायदेशीर बंदी आहे.
रिचर्ड होल्डन यांनी हा प्रस्ताव का आणला असेल? तर, त्यांच्या प्रस्तावासंदर्भात त्यांनी ‘ऑक्सफोर्ड जर्नल ऑफ लॉ अॅण्ड रिलिजन’च्या संशोधनाचा पुरावा दिला आहे. या संशोधनानुसार, अशा विवाहांतून होणार्या मुलांमध्ये अनुवांशिक आजारांचा धोका दुप्पट असतो. 2011 ते 2013 दरम्यान ब्रिटनमध्ये पाकिस्तानहून आलेल्या 13 हजार, 500 कुटुंबांचे सर्वेक्षण आणि अभ्यास मागे करण्यात आला होता. या अभ्यासात लक्षात आले की, 60 टक्के लोकांचा विवाह हा जवळच्या चुलत नातेसंबंधात झाला होता. इथले अनेक लोक अनुवांशिक आजाराने ग्रस्त होते.
अभ्यासकांचे म्हणणे आहे की, चुलत भाऊ-बहीण विवाहामध्ये होणारी संतती ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दुर्बल असते. त्यांच्या मातापित्यांची जनुके काही प्रमाणात समान असतात. त्यामुळे त्यांच्यातले सगळे गुणदोष त्या संततीमध्ये उतरतात. शरीरामध्ये समान जनुके असल्याने त्या अपत्यांच्या जनुकांमध्ये कोणतेही नावीन्य नसते. त्यामुळे शरीरामध्ये विकृती येते. याबाबत जिनेव्हा विश्वविद्यालयाचे तज्ज्ञ डॉ. स्टायलियानोस अॅटोनारकिस म्हणतात की, अनुवांशिकतेची वहन करणारी एकूण 2 हजार, 980 जनुके ज्ञात आहेत. मात्र, अंदाजे आठ हजार ते नऊ हजार जनुके अजूनही अज्ञात आहेत. अशाप्रकारे विवाह करण्यामध्ये पाकिस्तानचे लोक आघाडीवर आहेत.
पाकिस्तानमधील 65 टक्के निकाह हे चुलत भावाबहिणींचे आहेत. साहजिकच पाकिस्तानमधील जनता मोठ्या प्रमाणात अनुवांशिक आजाराने ग्रस्त आहे. पाकिस्तानच्या आगाखान विद्यापीठाच्या डॉ. अम्बरीन फातिमा यांनी म्हटले की, “जगाच्या परिक्षेपात ‘मायक्रोसेफली’ (डोके जास्त मोठे असणे) या आजाराचे सर्वाधिक रूग्ण पाकिस्तानमध्ये आहेत. चुलत नातेसंबंध विवाहामधून निर्माण झालेल्या संततीमध्ये हा अनुवांशिक आजार संक्रमित झाला.” याबाबत चार्ल्स डार्विनचे उदाहरण महत्त्वाचे आहे. चार्ल्सने त्यांच्या चुलत बहिणीशी एम्मा वेजवुड हिच्याशी विवाह केला. दोघांना दहा मुले झाली. मात्र, तीन मुले बालपणीच वारली. ‘नैसर्गिक निवडीचा सिद्धांत’ संशोधन करताना डार्विनला वाटले की, त्याच्यामध्ये आणि आणि एम्मामध्ये बहुसंख्य जनुके समानच होते. ती जनुके दोघांकडून मुलांमध्ये आली.पण, मुलांमध्ये नवीन शक्तिशाली जनुके तयार झाले नाहीत. त्यामुळे मुलांमधली जनुके दुर्बल होती आणि त्या दुर्बलतेमुळे मुले मृत्युमुखी पडली.
असो. चुलत भावाबहिणींच्या विवाहावर ब्रिटनमध्ये बंदी आणण्याचा प्रस्ताव आला. त्याला ब्रिटनच्या अपक्ष खासदार इकबाल मोहम्मदने आक्षेप घेतला. त्याचे म्हणणे की, “बंदी आणण्यापेक्षा या विवाहातून निर्माण होणार्या संततीमध्ये अनुवांशिक आजार कसे येणार नाहीत, त्यासंदर्भात जागृती केली पाहिजे.” अर्थात, या विवाह पद्धतीबद्दल अनेक दावे केले जात असले, तरीसुद्धा जगभरात दहा टक्के विवाह याच पद्धतीतले असतात. संपत्तीचे, सुरक्षिततेचे वितरण घरातच राहावे, कौटुंबिक आणि रितीरिवाजांची सुरक्षा राहावी, म्हणून या प्रथेचे समर्थन केले जाते.
या अनुषंगाने सौदी अरेबियामध्ये चुलत भाऊबहीण विवाहाचे प्रमाण सध्या 35 टक्के इतके आहे. मात्र, काही दशकांपूर्वीच सौदी अरेबियाने ‘हॅपी मॅरेज’ योजनेअंतर्गत वधुवरांची विवाहापूर्व रक्त, आरोग्य तपासणी करण्याचा उपक्रम राबविला. एका अहवालानुसार, 2015 साली सौदी अरेबियामध्ये नियोजित 33 लाख वधुवरांची तपासणी करण्यात आली. तेव्हा 1 लाख, 65 हजार व्यक्तींचे विवाह तुटले. कारण, आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यांच्यातल्या अनुवांशिक आजारांसदंर्भात माहिती मिळाली. आपल्याला होणारी संततीही हेच आजार घेऊन जन्माला येणार, या विचाराने हे निकाह होण्याआधीच तुटले. सौदी अरेबियाने या विवाहसंबंधाचे धोके काही दशकापूर्वीच ओळखले. सौदी अरेबियाला आपला आदर्श मानणारे मुस्लीम देश याबाबतीत सौदीचा आदर्श घेतील का? कारण, कझिन मॅरेज मॅटर!
9594969638