मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या प्रमुख पदी रामेश्वर नाईक यांची नियुक्ती

11 Dec 2024 18:05:43
 
rameshwar naik
 
मुंबई : (Rameshwar Naik) मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय पातळीवर महत्त्वाचे बदल करण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या सचिव पदी डॉ. श्रीकर परदेशी यांची नियुक्ती केल्यानंतर, आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या प्रमुख पदावर रामेश्वर नाईक यांची नेमणूक करण्यात आली आहे. यापूर्वी मंगेश चिवटे हे या पदावर कार्यरत होते.
 
काय आहे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष?
 
राज्यातील आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देणे, हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे उद्दिष्ट असून पूर, दुष्काळ, आग यांमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधीत नागरिकांना “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” मार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते. तसेच समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठीही या निधीतून अर्थसहाय्य पुरविले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात २०१४ साली राज्यात या कक्षाची स्थापना करण्यात आली होती. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या कार्यकाळात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे काम अधिक प्रभावी होण्यामध्ये मंगेश चिवटे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, आता मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा कारभार रामेश्वर नाईक यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
 
कोण आहेत रामेश्वर नाईक?
 
रामेश्वर नाईक यांनी छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातून कला शाखेत पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. २०१४ साली ते वैद्यकीय शिक्षण आणि जलसंपदा विभागात सल्लागार म्हणून नियुक्त झाले होते. पुढील काळात त्यांनी काही धर्मादायी संस्थांमध्ये सल्लागार आणि विश्वस्त म्हणून काम पाहिले. जुलै २०२१ मध्ये रामेश्वर नाईक यांची वैद्यकीय समितीच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली. तर ऑक्टोबर २०२३ मध्ये राज्यातील धर्मादायी संस्थांकडून चालवण्यात येणाऱ्या रुग्णालयांचे नियमन करणाऱ्या हेल्प डेस्क प्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. महायुती सरकारच्या गेल्या कार्यकाळात रामेश्वर नाईक यांनी उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रथम प्रमुख म्हणून कार्यभार सांभाळला होता.
 
रामेश्वर नाईक यांनी विविध पदांवर काम करताना राज्यात अनेक ठिकाणी तब्बल ११५ वैद्यकीय शिबिरे घेतली आहेत. या शिबिरांच्या माध्यमातून ब्रेस्ट कॅन्सर, लेप्रसी, डायबेटिसच्या हजारो रुग्णांवर उपचार करण्यात आले. याशिवाय, रामेश्वर नाईक यांच्या माध्यमातून कुपोषण निर्मुलन, अवयवदान यासाठीही शिबिरे घेण्यात आली आहेत. तसेच ८९ मोतीबिंदू उपचार शिबिरे आणि २२ रक्तदान शिबिरांचे आयोजनही डॉ. नाईक यांनी केले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0