दिव्यातील अनधिकृत शाळांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

11 Dec 2024 12:54:00
MESTA

ठाणे : दिव्यातील एका अनधिकृत शाळेमध्ये झालेल्या निंदनीय प्रकाराबाबत चौकशी करून कारवाई व्हावी, तसेच दिवा भागात असलेल्या अनधिकृत शाळा ( School ) बंद कराव्यात, अशी मागणी मेस्टा संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष नरेश पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. यामुळे दिव्यातील अनधिकृत शाळांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दिवा येथील एका अनधिकृत शाळेत दि. ३ डिसेंबर रोजी विद्यार्थिनीबाबत निंदनीय प्रकार घडला. अशा अनधिकृत शाळांवर कारवाई करण्यासाठी ‘मेस्टा’ संघटनेतर्फे प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात ठाणे महापालिका शिक्षण विभाग, जिल्हा परिषद ठाणे-प्राथमिक विभाग, माध्यमिक विभाग, शिक्षण उपायुक्त, मुंबई, तसेच विभागीय आयुक्त शिक्षण विभाग पुणे या विविध ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून दिवा येथे सुरू असलेल्या अनधिकृत शाळांची माहिती शासन दरबारी पोहचवीत असून, या अनधिकृत शाळा बंद होण्याऐवजी शाळांची संख्या ४० वरून ७० वर गेली आहे.

या अनधिकृत शाळांमध्ये कोणतीही गुणपत्रिका, शाळेचा दाखला, बोनाफाईड सर्टिफिकेट, लेटर हेड व स्टॅप हे बनवायचे कोणतेही अधिकार नसताना विद्यार्थ्यांची व पालकांची फसवणूक सुरू आहे. या अनधिकृत शाळांमध्ये सर्‍हासपणे विद्यार्थ्यांना खोटे कागदपत्रे दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला.

दिवा शहरात एकूण ६३ अनधिकृत शाळा सुरू आहेत. परंतु, शासनाने फक्त २९ एफआरआय दाखल केले आहेत. संघटनेमार्फत अनधिकृत शाळा त्वरित बंद व्हाव्यात, या करिता मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली असल्याचे सांगण्यात आले.

दिव्यात पालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करा

“ठाणे महापालिकेने ज्याप्रमाणे ठाणे शहरात तसेच कळवा-मुंब्रा येथे पालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या आहेत. त्याच धर्तीवर दिवा शहरातही ठाणे महापालिकेने इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू कराव्यात. जेणेकरून अनधिकृत शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची वेळ येणार नाही,” असे आवाहन मेस्टाच्या वतीने पालिकेला करण्यात आले आहे.

Powered By Sangraha 9.0