मुंबई : बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर झालेले हल्ले ( Violence ) आणि धार्मिक स्थळांच्या तोडफोडीच्या कृत्यांमुळे असंख्य लोक भयभीत झाले आहेत. त्यांच्या मूलभूत अधिकारांवर गदा येत आहे. या अस्थिर परिस्थितीकडे तातडीने लक्ष दिले नाही, तर त्याचे परिणाम बांगलादेशच्या पलीकडे पसरतील. ज्यामुळे संपूर्ण दक्षिण आशियाई प्रदेशातील स्थिरता आणि शांतता धोक्यात येईल, असा इशारा ‘नोबेल शांतता पुरस्कार’ विजेते कैलाश सत्यार्थी यांनी दिला आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांना उद्देशून पुढे ते म्हणाले की, “अल्पसंख्याकांवरील दडपशाही आणि मानवी हक्कांचे उल्लंघन हा आपल्या सामूहिक विवेकावर हल्ला आहे.
त्यामुळे कुठलाही विलंब न करता या बदलत्या परिस्थितीकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.” आपली मानवता, स्वातंत्र्य, सन्मान आणि समानतेचा अधिकार परिभाषित करणार्या सार्वभौमिक अधिकारांचे रक्षण करण्यासाठी आपण आपल्या सामायिक वचनबद्धतेची पुष्टी करूया असे आवाहनही कैलाश सत्यार्थी यांनी केले आहे.