मुंबई : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम कृष्णा ( S. M. Krishna ) यांचे मंगळवारी (१० डिसेंबर) रोजी पहाटे निधन झाले. त्यांनी वयाच्या ९२व्या वर्षी बंगळुरू येथील आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. एस. एम. कृष्णा हे कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रमंत्रीदेखील होते.
एस. एम. कृष्णा हे १ ऑक्टोबर १९९९ ते २० मे २००४ पर्यंत कर्नाटकाचे मुख्यमंत्री होते. २००४-२००८ या काळात त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम केले. त्यांनी परराष्ट्रमंत्री म्हणूनही आपली भूमिका बजावली आहे. असे हे माजी केंद्रमंत्री आणि कर्नाटकाचे मोठे नेते आता काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रसोबतच संपूर्ण भारत देश शोकावस्थेत आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली
"महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री श्री एस. एम. कृष्णा जी यांच्या निधनाने विकासाची कास धरणारे एक उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेले आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम करताना त्यांनी राज्याला मार्गदर्शन करण्याचे काम केले. विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा, राज्यसभा अशा सर्व सभागृहात काम करताना त्यांनी, विधानसभा अध्यक्ष, मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यपाल अशी सर्व पदे भूषविली. विद्यापीठ सुधारणा हे त्यांचे आवडीचे क्षेत्र होते. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो."
मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस
"महाराष्ट्राचे माजी राज्यपाल श्री.एस.एम.कृष्णा यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या रुपाने आधुनिक भारताच्या विकासाची पायाभरणी करणाऱ्या पिढीतला एक दुवाच निखळला आहे. बंगळुरुचा चेहरा मोहरा आता पालटलाय. आयटी आणि औद्योगिक क्षेत्र म्हणून बंगळुरु जागतिक नकाशावर आले, पण त्याचे शिल्पकार श्री.कृष्णा हेच होते, हे विसरुन चालणार नाही. "
उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदे
"माजी परराष्ट्रमंत्री, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांच्या निधनाची घटना अतिशय दुःखद आहे. आपल्या प्रदीर्घ राजकीय आणि सामाजिक वाटचालीत त्यांनी सदैव समाजसेवा हा वसा जपला. भविष्यातील तंत्रज्ञानाचे महत्त्व ओळखून बंगळुरू शहराला 'भारतातील प्रमुख आयटी हब' या रूपात विकसित करण्याचे श्रेय त्यांना जाते. त्यांच्या निधनाने काळाची पावले ओळखणारे तंत्रस्नेही नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले."