मुंबई : 'अॅनिमल' चित्रपटामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची कायमस्वरुपी छाप उमटवणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते उपेंद्र लिमये यांनी आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडे वाटचाल सुरु केली आहे. त्यांच्या बहुरंगी अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मराठी, हिंदीतील अनेक भूमिकांचे आजवर कौतक झाले. आणि आता थेट दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शकांनी मराठमोळ्या उपेंद्र लिमये यांचं कौतुक केलं आहे.
उपेंद्र लिमये यांनी ‘जोगवा’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘चौक’, ‘सावरखेड एक गाव’ अशा एकापेक्षा एक गाजलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. आता लवकरच ते तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असून उपेंद्र यांची महत्त्वाची भूमिका असणारा ‘संक्रांतिकी वास्तुनम’ हा पहिला तेलुगू चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यांच्या भूमिकेचं या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने देखील कौतुक केलं आहे. यासंदर्भातील व्हिडीओ उपेंद्र यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
उपेंद्र लिमये यांनी व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, “नमस्कार, हा माझा पहिला तेलुगू व्यावसायिक चित्रपट. याचं नाव आहे संक्रांतिकी वास्तुनम. या चित्रपटाचं शूटिंग काल संपलं आणि आज मी या चित्रपटाचं डबिंग सुद्धा संपवलं आहे. इतक्या वर्षांच्या करिअरमध्ये कधीही काल शूटिंग संपवून, लगेच आज डबिंग पूर्ण झालंय… असं झालेलं नाही. पहिल्यांदाच असं झालंय आणि हा एक अत्यंत समृद्ध करणारा व्यावसायिक अनुभव मिळाला. मला ही संधी दाक्षिणात्य लेखक-दिग्दर्शक अनिल रवीपुडी यांच्यामुळे मिळाली. तेलुगू इंडस्ट्री मधील ब्लॉकबस्टर लेखक-दिग्दर्शक अशी यांची ओळख आहे. सर, तुमचे खूप आभार तुमच्याबरोबर काम करताना खूप मजा आली.”
पुढे, दिग्दर्शक अनिल, उपेंद्र लिमये यांच्या कामाचं कौतुक करत म्हणाले, “उपेंद्र सरांबरोबर काम करून खूपच भारी वाटलं. हे किती भारी कलाकार आहेत हे मी शब्दात सांगूही शकत नाही. कोणतीही भूमिका ते अगदी सहज साकारू शकतात. त्यांचं टायमिंग कमाल आहे. सकाळी त्यांनी डबिंग सुरू केलं होतं आणि आता रात्रीचे १० वाजलेत. एवढा वेळ त्यांनी डबिंगसाठी काम केलंय. त्यांचं डेडिकेशन कमालीचं आहे. शिस्त, वेळेवर येणं…त्यांचं सगळं काही परफेक्ट असतं. या चित्रपटामध्ये तुम्हाला उपेंद्र सरांची एक वेगळी बाजू पाहायला मिळेल”. दरम्यान, उपेंद्र यांचा ‘संक्रांतिकी वास्तुनम’ हा चित्रपट १४ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.