‘रामायण’ चित्रपटात काम करण्याबाबत सनी देओलकडून भूमिका स्पष्ट; म्हणाला, “हा चित्रपट ‘अवतार’प्रमाणे…”

10 Dec 2024 12:48:26
 
ramayana
 
 
मुंबई : नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. या चित्रपटात नेमके कोणते कलाकार कोणती भूमिका सादर करणार यावरुन रंगणारी चर्चा आता पुर्णविरामापर्यंत आली आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. 'रामायण' या चित्रपटात प्रभू श्रीरामांची भूमिका रणबीर कपूर, सीता मातेची भूमिका साई पल्लवी साकारणार यावर फार आधीच शिक्कामोर्तब झाला आहे.
 
गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता सनी देओल या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात होते. त्यावर सनी देओलने स्वत:च भूमिका स्पष्ट केली आहे. तो 'रामायण' या चित्रपटाचा भाग असणार असल्याचे त्याने सांगितले आहे. नुकतीच सनी देओल आणि बॉबी देओल यांनी ‘स्क्रीन’ कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी सनी देओलने तो ‘रामायण’मध्ये काम करणार असल्याचे सांगितले. मात्र, नेमकी कोणती भूमिका साकारणार याचं स्पष्टीकरण त्याने दिले नाही. तो म्हणाला की, “ ‘रामायण’ चित्रपट एक फार मोठा प्रकल्प आहे. त्यामुळे आम्ही हा चित्रपट ‘अवतार’ व ‘प्लॅनेट ऑफ द अॅप्स’ या चित्रपटांसारखा बनविण्याचा प्रयत्न करत आहोत. निर्माते आणि दिग्दर्शक यांच्या डोक्यात हा चित्रपट कसा बनवावा आणि यातील पात्रं प्रेक्षकांसमोर कशी दिसावीत यासाठीचं चित्र स्पष्ट आहे.”
 
पुढे तो म्हणाला की, “नितेश तिवारी यांचा हा चित्रपट अतिशय प्रभावी ठरणार आहे. तुम्हाला यात काही स्पेशल इफेक्ट्ससुद्धा दिसतील. त्यामुळे चित्रपट पाहताना खरोखर अशा घटना घडल्या आहेत, यावर तुमचा विश्वास बसेल. खरं सांगायचं तर, मला याची खात्री आहे की, हा चित्रपट प्रेक्षकांना खूप जास्त आवडेल.”
 
दरम्यान, सनी देओल ‘रामायण’मध्ये हनुमान यांच्या भूमिकेत दिसणार, असं म्हटलं जात आहे. मात्र, सनी देओल किंवा अन्य कोणी यावर ठोस माहिती अद्याप दिली नाही आहे. परंतु, रामायण चित्रपटाचा मी भाग असून पहिल्या भागाचे चित्रिकरण पुर्ण झाले आहे आणि दुसऱ्या भागाचे चित्रिकरण सुरु होईल अशी माहिती सनी देओल याने या कार्यक्रमावेळी दिली. ‘रामायण’ चित्रपटाचा पहिला भाग २०२६ मध्ये दिवाळीत आणि दुसरा भाग २०२७ मध्ये दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार असे सांगितले जात आहे.
 
काही दिवसांपूर्वी अभिनेता रणबीर कपूर याने देखील ‘रेड सी फिल्म फेस्टिवल’मध्ये ‘रामायण’ बद्दल माहिती सांगितली होती. रणबीर म्हणाला होता की, “या चित्रपटाचे दोन भाग आहेत. त्यातील पहिल्या भागाचे चित्रिकरण पूर्ण झाले आहे. लवकरच दुसऱ्या भागाचे चित्रिकरण सुरु होणार आहे. या चित्रपटाचा मी एक भाग आहे आणि मला प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारण्यास मिळाली हे माझं नशीब आहे”.
Powered By Sangraha 9.0