कल्याण : ( Smriti Irani ) “विधानसभा निवडणुकीत काही लोक ‘व्होट जिहाद’चा नारा देत असल्याची माहिती माझ्यापर्यंत आली आहे. ही बाब भारताच्या संविधानाच्या विरोधात आहे. ‘व्होट जिहाद’ हे केवळ गैरसंविधानिकच आहे, असे नाही. तर धर्माच्या आधारावर समाजाला विभागण्याचे लाजास्पद काम विरोधक करत आहे. विकासाच्या मुद्द्यावर नागरिकांनी भाजपला मतदान करावे,” असे आवाहान माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केले.
कल्याण-पूर्व विधानसभेच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुलभा गणपत गायकवाड यांच्या प्रचारार्थ माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या जाहीर सभेचे आयोजन कल्याणमध्ये करण्यात आले होते. यावेळी त्यांनी उपरोक्त आवाहान केले. यावेळी व्यासपीठावर महायुतीच्या उमेदवार सुलभा गायकवाड, भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र (नाना) सूर्यवंशी, रेखा चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
स्मृती इराणी म्हणाल्या की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संसदेने महिलांना ३३ टक्के आरक्षण दिले. तेव्हा देशात एक इतिहास रचला गेला. महायुती सरकारच्या काळात महिलांना सन्मान दिला गेला. ‘जनधन योजना’, ‘लाडकी लेक योजना’, ‘लाडकी बहीण योजना’, ‘मुद्रा योजना’ अशा विविध योजनेच्या माध्यमातून ‘एनडीए’ सरकारने महिलांचा सन्मान वाढवला आहे. तसेच महायुतीने कल्याण-पूर्व मतदारसंघातून एका महिलेला उमेदवारी दिली आहे. त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या,” असे आवाहन त्यांनी केले.
काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० लागू होणार नाही!
काश्मीरमध्ये काँग्रेस आणि इंडिया अलायन्सने कलम ३७० बाबत प्रस्ताव पारित केला. त्यामुळे सर्वाच्च न्यायलायाच्या निर्णयाचा अवमान केला आहे. संविधानचा गळा आवळला गेला आहे. पण, प्रत्येक भारतीयांचे कलम ३७० पुन्हा लागू होणार नाही, हा संकल्प आहे. कलम ३७० लागू होते, तेव्हा महिलांना आणि मुलांना संरक्षण मिळत नव्हते. वनवासींच्या व दलितांच्या आरक्षण आणि हक्कांवर गदा आली होती. त्यामुळे काँग्रेसचे मनसुबे कधीही पूर्ण होणार नाहीत, असेही इराणी यांनी सांगितले.