कोपरी-पाचपाखाडीत पुन्हा ‘शिंदेशाही’!

09 Nov 2024 15:33:59
Eknath Shinde

ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या ठाण्याच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात बंडाळीचे ग्रहण लागल्याने ‘मविआ’ची ताकद क्षीण बनल्याचे दिसत आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) हे शिवसेना महायुतीमधून येथे लढत आहेत. ‘मविआ’मधील काँग्रेसच्या दोन पदाधिकार्‍यांनी बंड केले असुन मनसेनेही इथे उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे कोपरी-पाचपाखाडीत पुन्हा चौथ्यांदा जनतेचा कौल शिंदेशाहीला मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

मुंबईलगत असणार्‍या ठाणे जिल्ह्याला पहिल्यांदाच एकनाथ शिंदे यांच्या रूपाने मुख्यमंत्री पदाचा बहुमान मिळाला. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात ठाणे जिल्हा केंद्र स्थानी आला आहे. शिवसेना (शिंदे) विरुद्ध शिवसेना (उबाठा) असा महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सामना असला तरी एकनाथ शिंदे यांच्याविरोधात उभे केलेले धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे उबाठा गटाचे केदार दिघे यांचा तितकासा प्रभाव पडणार नसल्याचे चित्र दिसत आहे. ‘मविआ’मधील काँग्रेसचे मनोज शिंदे आणि सुरेश खेडेपाटील यांनी या मतदारसंघात शड्डू ठोकले असल्याने केदार दिघे यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. या मतदारसंघात स्वतः एकनाथ शिंदे प्रचारात उतरलेले नसतानाही उबाठा गट मात्र कोमात गेल्याचे दिसत आहे. उबाठाने साधे प्रचार कार्यालय देखील या मतदारसंघात सुरू केले नसून उबाठा सेनेच्या पदाधिकारी व शिलेदारांनीही दिघे यांच्या प्रचाराकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे.

सलग तीनवेळा वाढत्या मताधिक्यांनी निवडून आलेल्या एकनाथ शिंदे यांचा कोपरी-पाचपाखाडी हा अभेद्य गड आहे. झपाट्याने विकासाकडे झेपावणार्‍या या मतदारसंघात क्लस्टरच्या माध्यमातून पुर्नविकास होत आहे. इथे आरोग्य सुविधांसह अनेक विकासकामे प्रगतीपथावर असून ठाणे महापालिकेच्या माध्यमातुन तसेच शासनाच्या निधीतून मतदारसंघाचा कायापालट होत आहे. त्यातच महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेसह विविध योजनांच्या लाभार्थ्याचाही शिंदे यांनाच लाभ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ठाणे लोकसभा क्षेत्रातील ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचा भाग असलेला कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघ २००९ साली झालेल्या विभाजनात अस्तित्वात आला. देशाच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये वाटा उचलणारी वागळे इस्टेट एमआयडीसी येथे असुन ठाणे महापालिका क्षेत्रातील कोपरी, वागळे इस्टेट, रायलादेवी प्रभाग आणि लोकमान्य सावरकरनगर प्रभागाचा काही भाग या मतदारसंघात येतात. खुला गटासाठी असणार्‍या या मतदारसंघात सर्व जातीधर्माच्या नागरिकांचे वास्तव्य असुन त्यांचा एकनाथ शिंदे यांनाच कौल मिळत आला आहे. किंबहुना या मतदारसंघाचे नेतृत्व करत असताना शिंदे यांनी पालकमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, नगरविकास मंत्री आणि आता भाजपच्या कृपेने थेट मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली आहे.

कोपरी-पाचपाखाडी मतदार संघात एक लाख, ८० हजार, ५१६ पुरुष तर एक, लाख ५८ हजार ९८९ महिला मतदार आणि २१ तृतियपंथीय असे एकूण ३ लाख, ३९ हजार, ५२६ मतदार आहेत. २०१९ मध्ये युतीमधून लढलेल्या एकनाथ शिंदे यांना एक लाख, १३ हजार, मते मिळून तब्बल ८९ हजार मतांनी त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला होता. त्यामुळे या खेपेला एक लाखाहून अधिक मताधिक्य मिळवण्याचा चंग महायुतीने बांधला आहे.

Powered By Sangraha 9.0