‘विलेपार्ले हा हिंदुत्वाचा बालेकिल्ला’ - पराग आळवणी

    08-Nov-2024
Total Views |
Parag Alavani

मुंबई : विलेपार्लेला शिवसेनेचा बालेकिल्ला म्हटले जात असले तरी, तो खरेतर हिंदुत्वाचा बालेकिल्ला आहे. हिंदुत्व ही जीवनपद्धती आहे, हा विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मांडला आहे. तसेच, “आपल्याला प्रगती सरकार हवे आहे, आपल्याला महाविकास आघाडीसारखे स्थगिती सरकार नको,” असे परखड मत विलेपार्ले भाजपचे आमदार पराग आळवणी ( Parag Alavani ) यांनी व्यक्त केले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने साधलेला विशेष संवाद.

तिसर्‍यांदा निवडणूक लढवत आहात. यावेळी कशाप्रकारे निवडणुकीला समोरे जाणार?

आपण प्रचारात आघाडी घेतली आहे. कार्यकर्ते घरोघरी पोहोचले आहेत. तसेच, निवडणुकीपूर्वी केलेल्या कामांचे १९ अहवाल प्रकाशित करण्यात आले आहेत. ते अहवाल घेऊन आम्ही घरोघरी पोहोचलो आहोत. दहा वर्षांत केलेल्या कामामुळे मतदारसंघात ‘सहज उपलब्ध आमदार’ म्हणून ओळख निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे, केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवली आहे. आम्हाला प्रगती करणारे सरकार हवे आहे; महाविकास आघाडीसारखे स्थगिती सरकार नको, हा आमचा मुद्दा असणार आहे. असंख्य योजनांची माहिती देत असून एक सक्रिय आमदार म्हणून संधी मिळावी, यावर आम्ही काम करीत आहोत.

उबाठाने येथे उमेदवार दिला आहे; मनसेचा उमेदवार असल्याने आपण त्या आव्हानांकडे कसे बघता?

विलेपार्लेला शिवसेनेचा बालेकिल्ला का म्हटले जायचे, तर १९८७ साली पोटनिवडणुकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा नारा दिला. कालांतराने धर्माच्या नावाने मते मागितली, असा ठपका ठेवून डॉ. रमेश प्रभू यांची आमदारकी रद्द झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा हक्क काढून घेतला. पुढे सर्वोच्च न्यायालयाने हिंदुत्व ही जीवनपद्धती असल्याचा निकाल दिला. मुळात हा विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने रुजवलेला विचार आहे. त्यामुळे विलेपार्लेला शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणण्याऐवजी हिंदुत्वाचा बालेकिल्ला म्हणणे योग्य ठरेल. त्या निवडणुकीने इतिहास घडला. नुकतिच शिवसेनेतील एका गटाला ‘खरी शिवसेना’ म्हणून मान्यता मिळाली, तर एक गट काँग्रेससोबत गेला. १९८७ मध्ये झालेल्या निवडणुकीत तत्कालीन हिंदुत्ववादी विचारांचे समर्थन केले. त्याच विचारांचे कार्यकर्ते आता महायुतीच्या सोबत आहेत. आताच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार निवडून आला असला, तरी विलेपार्लेतून महायुतीच्या उमेदवाराला ५२ हजारांचा लीड दिला आहे. त्यामुळे विधानसभा मतदारसंघ पुन्हा विचारधारेचा बालेकिल्ला ठरेल.

सर्वसामान्यांमध्ये काम करणारा म्हणून ओळख असताना ‘व्हिजन’ काय आहे?

अगदी महाविद्यालयापासून निवडणुका लढलो आणि जिंकलो आहे. तसेच, महानगरपालिका निवडणूक जिंकलो आहे. त्यासाठी जनतेमध्ये जाऊन काम करावे लागते. ती सवय अंगवळणी पडली. लोकांमध्ये जाऊन काम करण्याचा स्वभाव बनला. विमानतळाच्या जमिनीवरील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आहे. काँग्रेस सरकारने त्यांना नोटीस दिल्या. त्याला आम्ही उत्तरे दिली. त्यामुळे लोकांमध्ये मिसळल्याने आंदोलने यशस्वी झाली आणि लोकांची घरे वाचली. आता सरकारने त्याबाबत कायदा बनवला. एअरपोर्ट फनेलचा विषय असेल, त्यात इमारतींची उंची वाढवू शकत नाही, हा प्रश्न आहे. प्रशासन त्यावर काम करीत आहे. पुढील काळात त्यावर काम करू. लोकांना घरे मिळवण्यासाठी आता करायचे आहे. पावसाळ्यात ‘मिलन सब वे’मुळे विलेपार्ले पाण्याखाली जात होते. मात्र, आता पाण्याचा तत्काळ निचरा केला जातो. त्यासाठी नवीन नाला बनवला. त्यामुळे लोक स्वतः सांगतात की, तुमच्यामुळे घरे वाचली आहेत.

फनेल झोनचा प्रश्न सोडविण्यासाठी महायुतीने काय केले?

फनेलची अडचण काय, तर पार्ला पूर्व ते कुर्ला फनेल आहे. फनेल म्हणजे काय, तर विमाने उतरण्याचा मार्ग. विमानतळापासून जसजसा हा मार्ग पुढे जातो, तसा तो रुंदावतो. त्यामुळे त्याला फनेलसारखा आकार येतो. त्यामुळे इमारतींना वेगवेगळे दर आहेत. कुर्ला आणि पार्ल्याला दर वेगळे आहेत. या विषयावर भूमिका मी मांडली आहे. त्यावर निकाल येत नाही, तोवर शांत बसणार नाही. पाठपुरावा पुढच्या काळात सुरूच राहील. देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले असते तर, प्रश्न केव्हाच मार्गी लागला असता. त्यांच्या अनेकांसोबत चर्चा झाल्या होत्या. सरकारमध्ये सातत्य नसल्याने आणि कोविडमुळे काम रखडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याबाबत भूमिका मांडली आहे.

नालेसफाई हा महत्त्वाचा प्रश्न आहे. निविदा निघतात, पण कामे नीट होत नाहीत. यामागचे कारण काय?

मुंबईत भरती असताना नाल्याचे गेट बंद करतो, त्यामुळे पाणी समुद्रात जात नाही किंवा पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी मुंबई पाण्याखाली जाते. त्यावर उपाय आहेत. ‘मिलन सब वे’ उपाय आणला. अंधेरी, हिंदमाता नावे आहेत. पण पाणी साचणार्‍या भागांच्या यादीतून ‘मिलन सब बे’ कमी झाला आहे. नाल्यांमध्ये गेट बसवले तर फायदा होऊ शकतो. पुढील काळात त्यावर उपाय करण्याचा प्रयत्न करू.

या भागात आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्याने पार्किंगचा विषय आहे. तसेच, वाहतुककोंडीची समस्या आहे, त्यावर उपाय काय?

विलेपार्ले स्थानक ते विमानतळ अतिशय गजबजला भाग आहे. यातील ८० टक्के गर्दी बाहेरची आहे. मेट्रोने फायदा होत आहे. पुढील काळात विमानतळावरील वर्दळ कमी होईल. विमानतळ व्यवसाय करताय त्यांनाही हे कळायला हवे. विमानतळ क्षेत्रात पार्किंग करावी. पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम ही चांगली करायला हवी, टुरिस्ट कारऐवजी मेट्रोचा वापर करावा. दिल्लीपेक्षा मुंबईची मेट्रो सक्षम होईल.

मतदारांना काय आवाहन कराल?

विलेपार्ले ही मुंबईची सांस्कृतिक राजधानी आहे. तसेच, शैक्षणिक भाग म्हणून ओळख असून सुशिक्षित मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. त्या नावलौकिकाला साजेशी मतदानाची टक्केवारी द्यावी. मोहल्ल्यात ७० टक्के मतदान होणार आणि सुशिक्षितांच्या भागात कमी मतदान होणार, हे चित्र यावेळी बदलू या. मला पुन्हा काम करण्याची संधी द्या, हे आवाहन आहे.