मुंबई : ( Municipal Commissioner ) मुंबई क्षेत्रातील (मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्हा) सर्व व्यवसाय, व्यापार, उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम आणि इतर आस्थापनांमध्ये कार्यरत असलेले कामगार, कर्मचारी तसेच अधिकार्यांना विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बुधवार, दि. २० नोव्हेंबर रोजी सुटी देणे संबंधित नियोक्तांसाठी बंधनकारक राहील. या नियमांचे पालन न करणा़र्यां नियोक्तांविरोधात कारवाई केली जाईल, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत.
भारत निवडणूक आयोग तसेच मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या निर्देशांनुसार, मुंबई क्षेत्रात (मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्हा) मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध अभिनव उपक्रम राबविले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर, मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्ह्यामधील सर्व मतदारांना निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी निर्देश जारी करण्यात आले आहेत.