मुंबई : “संविधानाची अनेकदा मोडतोड करणार्या आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कायम अवमान करणार्या काँग्रेसला जनता यावेळी माफ करणार नाही. आतापर्यंत केलेल्या संविधानाच्या अवमानाबद्दल आधी काँग्रेसने स्पष्टीकरण द्यावे,” अशी मागणी संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू ( Kiren Rijiju ) यांनी गुरुवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी केली.
‘भाजप मीडिया सेंटर’मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे केंद्रीय माध्यम समन्वयक के. के. उपाध्याय, राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ला, डॉ. सय्यद जफर इस्लाम, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रवक्ते ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते. “देशाची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर अधिक मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र आणि आर्थिक राजधानी मुंबईचे योगदान महत्त्वाचे आहे. महायुती सरकारच्या काळात अधिक वेगाने विकासकामे होत असून या कामांची पोचपावती मतदार देतील,” असा विश्वास रिजिजू यांनी व्यक्त केला.
“मागासवर्गातून आलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीवर पंतप्रधानांनी आतापर्यंत मोठी जबाबदारी सोपवल्याने मी जबाबदारीने सांगू शकतो की, जी व्यक्ती संविधानाचा सन्मान करत नाही, त्याच्या हातात संविधानाची प्रत आणि त्याच्या तोंडून ‘संविधान’ शब्द निघणे, हे निषेधार्ह आहे. निळ्या रंगाऐवजी लाल रंगाचे मुखपृष्ठ घालून आत कोरे कागद असलेल्या नकली संविधानाची प्रत राहुल गांधी यांनी नागपुरात नाचवली. त्यांच्या या कृत्याने डॉ. आंबडेकरांच्या आत्म्याला वेदना झाल्या असतील,” असे रिजिजू यावेळी म्हणाले.
रिजिजू यांनी सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पहिल्या केंद्रीय मंत्रिमंडळात घेतले जाऊ नये, यासाठी जवाहरलाल नेहरू यांनी त्यांचे नाव यादीतून वगळले होते. महात्मा गांधी आणि इतर काहींनी हे पहिले सरकार निवडणुकीद्वारे होत नसल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले. तेव्हा कुठे त्यांना देशाचे पहिले कायदामंत्रिपद देण्यात आले. तेव्हापासून नेहरू यांनी डॉ. आंबेडकर यांचा कायम अपमान केला. अखेरीस, डॉ. आंबेडकर यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ज्या ठिकाणी निवडणुका लढवल्या, त्या त्या ठिकाणी काँग्रेसने प्रयत्नपूर्वक त्यांचा पराभव केला. २०१५ पर्यंत काँग्रेसने ‘संविधान दिन’ का साजरा केला नाही?” असा प्रश्नही रिजिजू यांनी उपस्थित केला.
“आणीबाणी लादून तर काँग्रेसने लोकशाहीचा गळा आवळला होता. काँग्रेसने आधी संविधानावर त्यांनी वारंवार केलेल्या हल्ल्यांबाबत उत्तर द्यावे. तेव्हाच हातात संविधान धरावे आणि डॉ. आंबेडकर यांचे नाव घ्यावे. संविधान आणि डॉ. आंबेडकर यांचे नाव घेण्याचा काँग्रेसला काहीही अधिकार नाही.
नेहरू यांनीच सर्वप्रथम आरक्षणाला विरोध केला, याची नोंद संसदेच्या रेकॉर्डमध्ये आहे. काँग्रेसने डॉ. आंबेडकरांना भारतरत्न नाकारले होते. मात्र, जवाहरलाल नेहरू यांना देण्यात आले होते, हेही लक्षात घेतले पाहिजे,” असेही ते म्हणाले.
मुस्लिमांचा ‘व्होट बँक’ म्हणून वापर
“मुस्लिमांचा कायमच ‘व्होट बँक’ म्हणून वापर करत काँग्रेसने त्यांचे सर्वात मोठे नुकसानच केले. त्यामुळे मुस्लीम कायम गरीबच राहिले आणि फायदा मात्र काँग्रेसचा झाला. त्या पार्श्वभूमीवर भाजप समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन चालत आहे. त्यांचा विकास साधत आहे. काँग्रेसचा हा खोटारडेपणा आता उघड झाला असून अल्पसंख्याकांची मते महायुतीच्याच पारड्यात पडतील,” असा ठाम विश्वास रिजिजू यांनी व्यक्त केला. “लोकसभा निवडणूक प्रचारावेळी काँग्रेसने दिशाभूल करणारी माहिती, ‘फेक नरेटिव्ह’ पसरवले होते. मात्र, आता काँग्रेसचा हा प्रयत्न अयशस्वी झाला आहे. खरे काय आणि खोटे काय, हे महाराष्ट्रातील सूज्ञ जनतेने आता ओळखलेच आहे,” असे रिजिजू म्हणाले.