आचारसंहिता कालावधीत निवडणूक आयोग अॅक्शन मोडवर; तब्बल ५५८ कोटींचा मुद्देमाल जप्त!

07 Nov 2024 11:32:19
eci action during code of conduct


मुंबई :       विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहिता काळात महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये निवडणूक आयोगाकडून मोठ्या रकमेचा माल जप्‍त करण्यात आला आहे. महाराष्ट्रातून २८० कोटी तर झारखंडमधून १५८ कोटींचा मुद्देमाल जप्तीची कारवाई आयोगाने केली आहे.




दरम्यान, निवडणुका तसेच पोटनिवडणुकांच्या कालावधीत मतदारांना प्रलोभन देण्याची प्रकरणे रोखण्याच्या उद्देशाने निवडणूक आयोगाच्या अखत्यारित यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. आत्तापर्यंत केलेल्या कारवाईत ५५८ कोटी रुपये मूल्यांची रोकड, मोफत वाटपासाठी आणलेल्या प्रलोभनपर वस्तू, मद्य, अंमली पदार्थ आणि मौल्यवान धातू जप्त केले आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

विशेष म्हणजे निवडणुका जाहीर झाल्यापासून केवळ राज्यात केलेल्या कारवाई अंतर्गत सुमारे २८० कोटी रुपये मूल्याचा माल जप्त करण्यात आला आहे. तर झारखंडमधूनही आतापर्यंत आणखी १५८ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, झारखंडमध्ये दोन टप्प्यांत मतदान होणार असून १३ नोव्हेंबरला ४३ मतदारसंघांत तर उर्वरित ३८ मतदारसंघांत २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबर मतदान होणार असून दोन्ही विधानसभा निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.






Powered By Sangraha 9.0