राजा, रात्र वैर्‍याची आहे, जागा राहा!

07 Nov 2024 11:47:25

mh 
 
 
जोपर्यंत भारतात हिंदू समाजाची बहुसंख्या आहे, (‘हिंदू’ यात वैदिक, बौद्ध, जैन, शीख, सनातनी, आर्य समाजी असे सर्वपंथोपंथ येतात) तोपर्यंत लोकशाहीला काहीही धोका नाही आणि जोपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अस्तित्वात आहे, तोपर्यंत संविधानालाही काहीही धोका नाही. धोक्याची आरोळी जे ठोकतात, तेच देशाला फार धोकादायक आहेत.
 
विष्णुपंत हरी औंधकर यांचे ‘बेबंदशाही’ हे एकेकाळी अतिशय गाजलेले ऐतिहासिक नाटक. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील हे नाटक. नाटकातील तिसर्‍या अंकाचे कथानक संगमेश्वर येथे घडते. मुघल सेना अचानक येऊन छत्रपती संभाजी महाराजांना अटक करते. आदल्या रात्री संगमनेरच्या वाड्यात पडद्यामागून इशारा येत असतो. ‘राजा, वैर्‍याची रात्र आहे, जागा राहा!’ संभाजी महाराज हा इशारा ऐकतात. हे कोण सावध करतंय, याचा शोध घेऊ पाहतात. असा हा नाटकातील प्रसंग आहे.
महाराष्ट्रात भोसले कुळातील कोणी आज राजा नाही. आपण ‘प्रजा हीच राजा’ आहोत. संभाजी महाराज गाफील राहिले आणि पकडले गेले आणि राजा म्हणून आपण गाफील राहिलो, तर शत्रूकडून पकडले जाण्याचा धोका नाही, तर त्याहून भीषण धोका आपल्यापुढे आहे. आपल्या संविधानाने नागरिकांत धर्मभेद केलेला नाही. हा हिंदू, हा मुसलमान, हा ख्रिश्चन, हा पारशी अशी वर्गवारी केलेली नाही. लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करताना मुसलमान आणि ख्रिश्चन समाजाने ठरवून एका पक्षाविरुद्ध मतदान केले. म्हणजे मतदान करताना राजकीय विषय मुख्य न मानता, धर्माचे विषय त्यांनी मुख्य मानले.
 
या बाबतीत आपण हिंदू समाज म्हणून गाढ झोपलेले असतो. लोकसभेच्या निवडणुकीत सर्वांत कमी मतदान हिंदू मतदारांचे झाले. निकालानंतर त्यातील काही हळहळत बसले. फलाटावरून गाडी सुटून गेल्यानंतर कितीही बोंबाबोंब केली तरी, गाडी पुन्हा फलाटावर येत नाही. अशी वेळ विधानसभेच्या मतदानाच्या दिवशी जर आपण आणली, तर गेलेली गाडी काही परत येणार नाही!
 
हिंदू माणूस व्यक्तिगत स्वार्थाचा विषय जेव्हा असेल, तेव्हा अतिशय जागरूक राहतो. कोणी काही वाटण्याची घोषणा केली की, ते मिळविण्यासाठी तो तासन्तास रांगेत उभा राहील. ऊन, वारा, शारीरिक कष्टांची तो तमा बाळगणार नाही. परंतु, सामूहिक हिताची कोणती गोष्ट असेल, तेव्हा मात्र तो झोपून राहतो आणि ही त्याची झोप काळझोप असते. मोहम्मद घुरीने दिल्ली जिंकली आहे. त्याचे भाऊबंध उद्या दक्षिणेत येतील, त्याला तेथून हाकलून लावला पाहिजे, असे झोपलेल्या दक्षिणेतील हिंदू राजांना अजिबात वाटले नाही. स्वभावाप्रमाणे ते आपापसात लढत बसले. आपल्याच बांधवांशी लढण्यात हिंदू माणसाला पुरुषार्थ वाटतो. ऐक्याची वज्रमूठ करून तो आपल्या संस्कृती विद्ध्वसंकांपुढे लढायला उभा राहतो.
 
याउलट इंग्रज माणसाचे असते. इंग्रज माणूस कधीच एकटा नसतो. ‘एक अधिक एक दोन’ अशी कधीच त्यांची बेरीज होत नाही. ‘एकावर एक अकरा’ अशी त्यांची बेरीज असते. व्यापारासाठी ‘ईस्ट इंडिया कंपनी’ सुरू झाली. सुरत बंदरात कंपनीची छोटी वखार होती. बंगालमध्ये तेव्हा काही नव्हते. १६४१ साली शहाजहान राजाची आवडती मुलगी जहाँ आरा अतिशय गंभीर भाजली. शहाजहान त्यावेळेस जगातील सर्वांत श्रीमंत सम्राट होता. त्याने आपल्या मुलीवर उपचार करण्यासाठी निष्णात हकीम आणि वैद्य लावले. त्यांच्या उपचारांचा परिणाम काही दिसेना. तेव्हा शहाजहान राजाला आपल्या दूतांकडून समजले की, सुरतच्या बंदरात ’कचड केशिुशश्रश्र’ या जहाजावर डॉ. गॅब्रियेल बोग्टन नावाचा डॉक्टर आहे. शहाजहानने त्याला आग्र्याला बोलावून घेतले. त्याच्या उपचाराने जहाँ आरा बरी होत गेली. बादशहा खूश झाला आणि या इंग्रज डॉक्टरला त्याने खूप धनसंपत्ती देऊ केली. या इंग्रज डॉक्टरने ती नाकारली आणि तो म्हणाला, “मला व्यक्तिशः काही नको. माझ्या ‘ईस्ट इंडिया कंपनी’ला तुम्ही मुघल साम्राज्यातील बंदरात जकात माफ करा आणि वखारी उघडण्यास अनुमती द्या.” यानंतर ‘ईस्ट इंडिया कंपनी’ची पहिली वखार बंगालमध्ये हुबळी येथे सुरू झाली आणि या स्थानाचा उपयोग करून पुढे प्लासीची लढाई आणि ब्रिटिशांचे राज्य असा प्रवास सुरू झाला.
 
कल्पना करूया की, त्या इंग्रज डॉक्टरच्या जागी एखादा हिंदू असता, तर त्याने बादशाहकडे काय मागितले असते? उत्तर आपल्यापैकी प्रत्येकाला माहीत आहे. म्हणून ते इथे देण्याची गरज नाही. म्हणूनच आम्हाला आमच्या समूहहितासाठी जागृत राहिले पाहिजे.
 
देशात वेगवेगळ्या प्रकारचे ‘जिहाद’ चालतात. ‘व्होट जिहाद’ हा भयंकर प्रकार आहे. म्हणून यावेळी मतदान करताना ‘उमेदवाराचा चेहरा मला आवडतो, त्याचे भाषण आवडते, तो खूप करमणूक करतो, तो विरोधकांची उलटीसुलटी करतो’ वगैरे वगैरे कसल्याही मोहात न पडता समूहाचे अंग म्हणून माझे हित कशात आहे, याचाच विचार करून मतदान केले पाहिजे. रामदास स्वामी म्हणतात की, अळीदेखील मार्गक्रमण करताना आपल्याला धोका कुठून आहे, हे पाहूनच पुढे जाते. ‘मनुष्य असूनही भ्रमले। यासि काय म्हणावे॥’ 
 
कोणत्याही भ्रमात अडकू नये. भ्रम निर्माण करणारी अनेक कथानके काल चालू होती, आज चालू आहेत, उद्याही चालू राहतील. ‘संविधान बदलले जाणार आहे, ही शेवटची निवडणूक आहे, हुकूमशाही निर्माण होणार आहे, आरक्षण काढून घेतले जाणार आहे,’ अशी अनेक खोटी कथानके कालही होती आणि आजही चालवली जातात. जोपर्यंत भारतात हिंदू समाजाची बहुसंख्या आहे, (‘हिंदू’ यात वैदिक, बौद्ध, जैन, शीख, सनातनी, आर्य समाजी असे सर्व पंथोपंथ येतात) तोपर्यंत लोकशाहीला काहीही धोका नाही आणि जोपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अस्तित्वात आहे, तोपर्यंत संविधानालाही काहीही धोका नाही. धोक्याची आरोळी जे ठोकतात, तेच देशाला फार धोकादायक आहेत.
 
‘डीप स्टेट’ नावाचा एक शब्दप्रयोग लोकसभा निवडणुकीनंतर अधिक प्रचारात आला. त्याचा थोडक्यात अर्थ असा की, लोकांनी निवडून दिलेले आणि लोकांना जबाबदार असलेले शासन अधिकारावर असताना हे शासन कमजोर करण्याची दुसरी अदृश्य शासन यंत्रणा देशात चालू राहते. या न दिसणार्‍या शासन यंत्रणेला ‘डीप स्टेट’ असे म्हणतात. या ‘डीप स्टेट’चा प्रभाव किती असतो, तो समजून घेण्यासाठी आपल्याला बांगलादेशात जे घडले, त्याचा विचार करावा लागेल. लोकांनी निवडून दिलेले शेख हसीना यांचे शासन ‘डीप स्टेट’वाल्यांनी पाडले. आपल्या भारतातही निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेणारे, निवडणूक आयोगाला शिव्या घालणारे, चौकशी यंत्रणांवर संशय घेणारे, पंतप्रधानांच्या हेतूंवर संशय व्यक्त करणारे कोण आहेत? त्यांची नावे सांगायलाच पाहिजेत का? लोकशाहीला धोका त्यांच्यापासून आहे.
 
हे लक्षात घेतले तर ‘राजा, वैर्‍याची रात्र आहे, जागा राहा’ या वाक्याचा अर्थ समजेल. मतदान करताना आपण फक्त जातीचा विचार केला, ‘मला काय मिळणारे’ याचा विचार केला किंवा खोट्या कथानकाला बळी पडण्याचा विचार केला, तर आपल्या हाताने आपण आपले अहित करून घेऊ. म्हणून तिसर्‍यांदा सांगायला पाहिजे की, राजा, वैर्‍याची रात्र आहे.....जागा राहा!!!
 
रमेश पतंगे

९८६९२०६१०१
Powered By Sangraha 9.0