ट्रम्प विजयामुळे भारत - अमेरिका भागीदारी अधिक मजबूत होणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन

06 Nov 2024 17:59:16
 
modi
 
 
 
नवी दिल्ली : ( PM Narendra Modi ) अमेरिकेच्‍या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय प्राप्त केल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अभिनंदन केले. भारत - अमेरिकेतील समावेशी जागतिक आणि धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या हेतूने सहयोग पुनर्स्थापित करण्यासाठी उत्सुक असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
 
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील विजयानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन करणाऱ्या पहिल्या जागतिक नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश होता. ‘एक्स’ या समाजमाध्‍यमावर पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, "माझे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांचे निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल हार्दिक अभिनंदन. आपण याआधीच्या कार्यकाळातील कारकीर्दीच्या यशामध्‍ये अधिक भर घालत आहात, अशावेळी भारत आणि अमेरिका व्‍यापक वैश्विक आणि धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या हेतूने सहयोग पुनर्स्थापित करण्यासाठी मी उत्सुक आणि तत्पर आहे. आपल्या जनतेच्या कल्याणासाठी आणि जागतिक शांतता, स्थैर्य आणि समृद्धी प्रस्थापित व्हावी यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आपण एकत्र येऊन काम करूया," अशी आशादेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे.
 
 
 
 
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे संबंध एकमेकांशी नेहमीच घनिष्ट आणि सकारात्मक राहिले आहेत. दोन्ही देशातील राजनयिक संबंध आणि धोरणात्मक सहकार्यास वैयक्तिक संबंधांतील उबदारपणाने नेहमीच मजबुती प्रदान केली आहे. त्यामुळे आगामी काळातही भारत - अमेरिका संबंध विद्यमान जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे ठरणार आहेत.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प या दोन्ही नेत्यांनी संरक्षण आणि सुरक्षा संबंध मजबूत करण्याला प्राधान्य दिले, विशेषत: दहशतवादाचा मुकाबला करणे आणि पाकिस्तानकडून उद्भवलेल्या प्रादेशिक धोक्यांविषयी दोन्ही नेत्यांनी समान भूमिका घेतली.
चीनच्या वाढत्या प्रभावाच्या संदर्भात मुक्त हिंद – प्रशांत महासागर क्षेत्रात दोन्ही देशांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले आहे. दोन्ही देशातील आर्थिक संबंध घट्ट करण्यासही दोन्ही नेत्यांनी प्राधान्य दिले आहे. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातील “अमेरिका फर्स्ट” धोरणाने व्यापाराला अधिक चालना दिली, तर पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या हितसंबंधांचा अमेरिकेशी समतोल साधण्याचा प्रयत्न केला. भारताच्या वाढत्या आर्थिक सामर्थ्याबरोबरच व्यापार संबंध सुधारण्यावर सामायिक लक्ष केंद्रित केल्याने दोन्ही देशांमधील मजबूत संबंध राखण्यास मदत झाली.
 
 
 
Powered By Sangraha 9.0