दादर रेल्वेस्थानकातील असुविधांकडे मुंबई भाजपने वेधले रेल्वेमंत्र्यांचे लक्ष

05 Nov 2024 16:47:54

DADAR
 
मुंबई : ( Dadar Railway Station ) मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या दादर रेल्वे परिसरातील अस्वच्छता, फेरीवाल्यांचा विळखा आणि टॅक्सीवाल्यांच्या मनमानीकडे मुंबई भाजपने रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे लक्ष वेधले आहे. यासंदर्भातील निवेदन रेल्वेमंत्र्यांना सादर करीत समस्यांचे निराकरण करण्याची विनंती भाजपने रेल्वे मंत्र्यांना केली आहे.
 
दादर हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे दररोज मध्य आणि पश्चिम रेल्वेस्थानकावरून लाखो प्रवासी प्रवास करतात. सर्वसामान्य मुंबईकरांसह बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना या गर्दीचा त्रास सहन करावा लागतो. दादर पूर्व आणि पश्चिमेकडील अनधिकृत फेरीवाल्यांमुळे रेल्वेस्थानकात ये-जा करताना प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागते. त्याशिवाय फेरीवाल्यांमुळे अस्वच्छता ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. 'स्वच्छ भारत' या संकल्पनेसाठी हे साजेसे चित्र नाही.
 
टॅक्सीवाल्यांच्या मनमानीमुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. जवळचे भाडे नाकारण्याचे प्रकार वाढले आहेत. शिवाय स्थानक परिसरात बेकायदेशीररित्या गाड्या उभ्या करून ठेवल्या जात असल्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे रेल्वे प्रशासन, मुंबई पालिका आणि वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन या समस्यांचे निराकरण करावे, अशी विनंती मुंबई भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0