अन्य तीन ठिकाणी महायुती, मविआ आणि मनसेत तिरंगी लढती

05 Nov 2024 14:59:35
Mahayuti

ठाणे : ( Mahayuti ) ठाण्याच्या कोपरी-पाचपाखाडी मतदार संघात मविआ आघाडीत बंडाळी कायम आहे. विधानसभा निवडणुकीच्या अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी कोपरी-पाचपाखाडी मतदार संघातून काँग्रेसच्या मनोज शिंदे आणि सुरेश पाटील खेडे या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी न घेतल्याने मविआमधील उबाठा गटाच्या उमेदवाराच्या अडचणी वाढल्या आहेत.

मविआतील या बंडाळीमुळे शिवसेना महायुतीचे उमेदवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. दरम्यान, ठाणे शहर, ओवळा-माजिवडा आणि कळवा-मुंब्रा मतदार संघात महायुती, मविआ आणि मनसे अशा तिरंगी लढती रंगणार आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रात विस्तारलेल्या ठाणे शहर, ओवळा-माजिवडा, कोपरी पाचपाखाडी आणि कळवा-मुंब्रा हे चार मतदार संघ येतात. यातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात मविआमधून उबाठा गटाचे केदार दिघे उभे आहेत. या मतदार संघात काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी मनोज शिंदे आणि सुरेश पाटील खेडे यांनी बंडाळी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

सोमवारी दि. ४ नोव्हेंबर रोजी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी कोपरी पाचपाखाडीत १२ पैकी तीन जणांनी माघार घेतली. ठाणे मतदार संघात दोन अपक्षांनी माघार घेतल्याने भाजप महायुतीचे संजय केळकर, मविआचे राजन विचारे आणि मनसेचे अविनाश जाधव यांच्यात तिरंगी लढत रंगणार आहे. याच मतदार संघात जिजाऊ संघटनेच्या आरती भोसले याही रिंगणात आहेत.

कळवा-मुंब्रा मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादी समोरासमोर लढत असताना मनसेही रिंगणात आहे. येथे शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाडांना अजितदादा गटाच्या नजीब मुल्ला यांचे कडवे आव्हान आहे. कळवा-मुंब्रा मतदार संघात २१ पैकी दहा उमेदवारांनी माघार घेतली आहे. ओवळा-माजिवड्यात दोन्ही शिवसेना भिडणार आहेत. येथे मनसेनेही शड्डू ठोकला आहे. महायुतीचे आ. प्रताप सरनाईक यांचा मविआचे नरेश मणेरा आणि मनसेच्या संदीप पाचंगे यांच्याशी सामना रंगणार आहे. या मतदार संघात १७ पैकी तीन जणांनी माघार घेतली आहे.

Powered By Sangraha 9.0