मराठीद्वेष्ट्या काँग्रेसबाबत उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी : आमदार शेलार

05 Nov 2024 15:21:37
Ashish Shelar

मुंबई : ( Ashish Shelar ) “विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील कॉँग्रेसने मुंबईत जे ११ उमेदवार दिले आहेत, त्यातील केवळ दोनच उमेदवार मराठी आहेत. इतका पराकोटीचा मराठीद्वेष दाखवणार्‍या कॉँग्रेसबद्दल आपली भूमिका काय आहे, हे स्पष्ट करा,” असे आव्हान मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना दिले.

सोमवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी भाजप मीडिया सेंटरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रवक्ते ओमप्रकाश चौहान आदी यावेळी उपस्थित होते. शेलार यांनी सांगितले की, “या निवडणुकीत काँग्रेसने मराठी चेहरे डावलत वरिष्ठ मराठी नेत्यांना कात्रजचा घाट दाखवला आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या आंदोलनाच्या वेळी, महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य होऊ देणार नाही, अशी काँग्रेसची भूमिका होती. आंदोलक मराठी माणसांवर गोळ्या झाडल्या गेल्या. त्यात १०६ मराठी माणसे हुतात्मा झाली.” आताही तीच मराठी द्वेष्टी भूमिका घेत काँग्रेसने मराठी माणसांना उमेदवारी डावलल्याकडे शेलार यांनी लक्ष वेधले.

या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी अशी मुख्य लढत आहे. राज्यातील महाविकास आघाडीची अडीच वर्षे आणि महायुतीच्या कारभाराची अडीच वर्षे अशी तुलना होणे स्वाभाविक आहे. महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे स्थगितीचे वाहक आणि महायुती म्हणजे प्रगतीचे शिलेदार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या नागरिकांना निर्णय घेणे आता खूप सोपे आहे. सामना सोपा होत चालला आहे आणि महाराष्ट्रातील जनता आम्हालाच कौल देऊन महायुती सरकार सत्तेवर येईल, असा विश्वास शेलार यांनी यावेळी व्यक्त केला.

अ‍ॅड. शेलार म्हणाले की, “आघाडीतील घटक पक्ष याकूब मेमनचे समर्थन करतात. इब्राहीम मुसा हा बॉम्बस्फोटातील दोषसिद्ध आरोपी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा प्रचार करतो. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या पोलीस अधिकार्‍यांना लागलेल्या गोळ्या या कसाबने झाडलेल्या नव्हत्या,” असे म्हणणार्‍या प्रवृत्तीला दूर ठेवण्याची आवश्यकता आहे.


नाना पटोलेंना नोटीस बजावणार पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या महायुती सरकारच्या हस्तक असल्याचा बिनबुडाचा आरोप करणार्‍या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांचे आरोप सिद्ध करावेत. त्यांना आम्ही सात दिवसांची नोटीस पाठवणार असून, निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही करणार असल्याचे अ‍ॅड. शेलार यांनी सांगितले. “एखाद्या शासकीय अधिकार्‍यावर असे बेछूट आरोप करत त्यांना लक्ष्य करणे, त्यांचा छळ करणे हे अतिशय निषेधार्ह आहे. अशी भूमिका पुढे काँग्रेसला महाग पडू शकते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. आपल्या मनासारखे झाले की, निवडणूक आयोग निष्पक्ष आणि मनासारखे झाले नाही की, पक्षपाती असे काँग्रेसचे धोरण आहे. त्यामुळे उद्या पराभव झाला की, खोटे अश्रू ढाळू नका,” असा टोलाही आ. आशिष शेलार यांनी काँग्रेसला लगावला.

Powered By Sangraha 9.0