आरबीआय 'डेप्युटी गव्हर्नर' पदाकरिता सरकारने अर्ज मागवले; वेतन, पात्रता निकष जाणून घ्या

04 Nov 2024 14:15:01
government-invites-applications-for-the-post


मुंबई :      केंद्रीय अर्थ मंत्रालयाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(आरबीआय)च्या डेप्युटी गव्हर्नर पदाकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत. आरबीआयचे विद्यमान डेप्युटी गव्हर्नर देवव्रत पात्रा यांच्या जागी नियुक्ती केली जाणार असून त्यांचा वाढीव कार्यकाळ दि. १४ जानेवारी २०२५ रोजी संपुष्टात येणार आहे. परिणामी, अर्थ मंत्रालयाकडून अर्ज मागविण्यास सुरूवात झाली असून आरबीआय डेप्युटी गव्हर्नर पदावर लवकरच नियुक्ती केली जाणार आहे.

 
दरम्यान, वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाकडे अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख दि. ३० नोव्हेंबर २०२४ असणार आहे. संबंधित व्यक्ती अर्थतज्ञ्ज असावी व सार्वजनिक घोषणेमध्ये नमूद केलेल्या पात्रता निकषांनुसार, अर्जदारांना सार्वजनिक प्रशासनात किमान २५ वर्षांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच, भारत सरकारमधील सचिव किंवा समकक्ष स्तरावरील अनुभवाचा समावेश आहे.

त्यात म्हटले आहे की, दि. १५ जानेवारी २०२५ रोजी उमेदवारांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त नसावे. पद नियुक्ती तीन वर्षांच्या कालावधीसाठी असून संबंधित व्यक्ती पुनर्नियुक्तीसाठी पात्र असेल. या पदासाठी मासिक वेतन २.२५ लाख रुपये(स्तर-१७) असेल. मध्यवर्ती बँकेत चार डेप्युटी गव्हर्नर कार्यरत असतात. एक अर्थतज्ञ, एक व्यावसायिक बँकर आणि बँकेतील दोन जणांची मौद्रिक धोरण विभागाची देखरेख करण्यासाठी नियुक्त केली जाते.




Powered By Sangraha 9.0