
ओटावा : कॅनडामध्ये हिंदू मंदिरातील भक्तांवर खालिस्तानी फुटीरतावाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर आता ब्रॅम्प्टन मधील वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच आता समाज माध्यामांवर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या मध्ये एक पुजारी तिथल्या भक्तांना "बटेंगे तो कटेंगे"चा संदेश देताना दिसत आहेत. जात, धर्म, विचारधारा या सगळ्यांच्या पलिकडे जाऊन हिंदू म्हणून एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
"कॅनडामधी हिंदू समाजाने सुद्धा आता एकत्र येण्याचे वेळ आली आहे. हा केवळ कोणत्याही हिंदू सभेवर किंवा मंदिरावर झालेला हल्ला नाही; हा जगभरातील प्रत्येक हिंदूवर हल्ला आहे. म्हणूनच वेळ आली आहे की आपण आता फक्त स्वतःचा विचार करायचा सोडून आपल्याला आपल्या भावी पिढ्यांचा विचार करायचा आहे." असे सुद्धा या पुजाऱ्यांनी म्हटले. मंदिराच्या बाहेर जमलेल्या लोकांनी 'भारत माता की जय'च्या घोषणा दिल्या. खलिस्तान समर्थक गटाने मंदिराच्या आवारात घुसून भाविकांवर हल्ला केला होता. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी या हल्ल्याचा निषेध जरी केला असला, तरी खलिस्तानी फुटीरतावाद्यांचा हात असल्याचे त्यांनी नाकरले आहे. यानंतर घडलेला अजब प्रकार म्हणजे ज्या पोलिसांनवर कायदा आणि सुव्यवस्था राखायची जबाबदारी असते, त्यांनी उलट भक्तांवरच हल्ला चढवला. खलिस्तानी फुटीरतावाद्यांना जणू ते समर्थन देत आहेत की काय अशीच परिस्थीती उद्भवली होती. या वर्षी जूनमध्ये, एडमंटनमध्ये BAPS श्री स्वामीनारायण मंदिराची खलिस्तानी समर्थकांकडून तोडफोड करण्यात आली. या घटनेमुळे हिंदू संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
बांगलादेशातील हिंदूंच्या झालेल्या कत्तलींवर भाष्य करताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी "बटेंगे तो कटेंगे" हा संदेश दिला. हिंदू समाजाने सर्व मतभेद बाजूला सारून एकत्र आलं पाहिजे असं योगींनी वारंवार सांगितलं.