जिल्ह्यातील शेती वर्षभर बहरणार; उद्योगांनाही मिळणार मुबलक पाणी

२४ धरणांमध्ये ९७.५८ टक्के उपयुक्त जलसाठा

    30-Nov-2024
Total Views |
Dam

नाशिक : यंदा नाशिक जिल्ह्यावर वरुणराजाने चांगलीच कृपादृष्टी दाखवल्याने जिल्ह्यातील सर्वच धरणे काठोकाठ भरली आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच पुढील वर्षभराचा शेतीच्या पाण्याचाही प्रश्न सुटला आहे. त्याचप्रमाणे शेतात असलेल्या विहिरी आणि बोअरवेललादेखील मुबलक पाणी ( Water ) असल्याने जिल्ह्यातील शेती वर्षभर बहरणार असल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान मागील वर्षी अचानक पावसाने ओढ दिल्याने धरणांमध्ये जलसाठा उपलब्ध झाला असला, तरीही विहिरींनी तळ गाठल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक फटका सहन करावा लागला होता. तर काही गावांना टॅन्करने पाणीपुरवठा करावा लागला होता. मात्र, यंदा जिल्ह्यातील २४ धरणे मिळून ६४ हजार, ७६ दलघफु जलसाठा निर्माण झाला असून, त्याची टक्केवारी ९७.५८ इतकी आहे. त्यामुळे पिण्याबरोबरच शेती आणि उद्योगांनाही मुबलक पाणी मिळणार आहे.

जून आणि जुलै महिना कोरडा गेल्याने चांदवड, सटाणा आणि नांदगाव या तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने पाण्याअभावी पिके करपून गेली होती. तसेच कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले होते. मात्र चालू वर्षी या भागातील धरणांमध्ये वर्षभर पुरेल इतका जलसाठा निर्माण झाला आहे. नाशिक शहराची तहान भागविणार्‍या गंगापूर धरण समूहामध्ये ९३.१८ टक्के जलसाठा शिल्लक आहे, तर एकट्या गंगापूर धरणामध्ये सद्यस्थितीत ९७.०२ टक्के इतका उपयुक्त जलसाठा आहे. या जलसाठ्यातून पुढील वर्षाचीही नाशिकची तहान भागविली जाणार आहे.

जिल्ह्यातील सर्वच धरणांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक जलसाठा

नाशिक जिल्ह्यातील २४ धरणांपैकी २३ धरणांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक जलसाठा अजूनही शिल्लक आहे. त्यात कायम दुष्काळी तालुक्यांना पाणीपुरवठा करणार्‍या चणकापूर, केळझर, नागासाक्या, गिरणा आणि माणिकपुंज या पाच धरणांमध्ये १०० टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. तर गौतमी गोदावरी धरणाची टक्केवारी ७४.४६ इतकी आहे. त्यामुळे या तालुक्यातील दुष्काळी भागातील शेतीलाही संजीवनी मिळणार आहे.

शेतीला वर्षभर पाणी शक्य

नाशिक जिल्ह्यात शेतीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्ग वर्षभर आपल्या शेतात वेगवेगळी पिके घेत असतो. यामध्ये निफाड, दिंडोरी आणि नाशिक तालुक्याच्या काही भागात द्राक्ष शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. तर चांदवड, कळवण, येवला, सिन्नर या तालुक्यांमध्ये कांदा आणि मका, तर बागलाण तालुक्यात कांदा पिकाबरोबरच डाळिंबाची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. मागील वर्षी झालेल्या अपुर्‍या पावसामुळे जिल्ह्यातील शेती धोक्यात आली होती. मात्र यंदा वरुणराजाच्या कृपेने जिल्हा वर्षभर हिरवागार राहण्यास मदत होणार आहे.