महाराष्ट्रातील प्रमुख राममंदिरे-श्री काळाराम मंदिर (नाशिक)

    30-Nov-2024
Total Views |
shree kalaram mandir nashik


अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिर निर्माणाच्या ऐतिहासिक सुवर्णयोग घटनेनिमित्त दै. ‘मुंबई तरुण भारत’ने ‘नित्यविजयी रघुनंदन’ ही, मराठी संतसाहित्यातील रामदर्शनाची लेखमाला, जानेवारीमध्ये सुरू केली आणि आपण गेल्या 11 महिन्यांत 46 लेखांद्वारे, संत निवृत्तीनाथ-ज्ञानदेवांपासून ते थेट आधुनिक संत गोंदवलेकर, साईबाबा यांच्या साहित्यातील परब्रह्म रामाचे व रघुवीररामाचे विविधांगी दर्शन केलेले आहे. श्रीराम भारतीय जीवनाचा सर्वोच्च आदर्श आणि सर्वाधिक भक्तजनप्रिय उपास्य देवता आहे. या श्रीरामाची महाराष्ट्रात अनेक मंदिरे आहेत. त्यातील प्रमुख ऐतिहासिक अशा मंदिरांची आपण पुढील तीन-चार लेखांत माहिती घेऊया. त्यातील पहिले ऐतिहासिक मंदिर म्हणजे नाशिकचे सुप्रसिद्ध श्री काळाराम मंदिर...

श्री क्षेत्र पंढरपूरला ‘भूवैकुंठ’ म्हणतात, तसे श्रीक्षेत्र नाशिकला ‘दक्षिण काशी’ म्हणून भाविक भक्तांमध्ये, श्रद्धावंतांमध्ये सर्वोच्च स्थान आहे. दक्षिणवाहिनी माता गोदावरी नदीच्या काठी वसलेल्या या नगरीला ‘कुंभनगरी’ म्हणून हिंदू परंपरेत विशेष स्थान आहे. दर बारा वर्षांनी होणारा ‘सिंहस्थ कुंभमेळा’ ही तर नाशिकची खास ओळख. त्रेतायुगात प्रभू रामचंद्राचे वनवास काळात या ‘जनस्थान’ नगरीच्या पंचवटी भागात वास्तव्य होते. राम-सीता आणि लक्ष्मणाच्या पुनीत वास्तव्याची अनेक पदचिन्हे आजही नाशिकमध्ये विद्यमान आहेत. श्री काळाराम मंदिर त्या परममंगल पदचिन्हांपैकी एक आहे. आज जेथे भव्य, दिव्य, आकर्षक असे श्री काळाराम मंदिर विद्यमान आहे, तेथेच त्रेतायुगात वनवासकाळात लक्ष्मणाने राम-सीतेने बांधलेली पर्णकुटी होती, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या काळाराम मंदिरास एक विशेष स्थान आहे. महाराष्ट्रात प्रभू रामचंद्राची अनेक मंदिरे आहेत. त्यात रामटेकचे राम-लक्ष्मण मंदिर आहे, चाफळचे समर्थ रामदास स्थापित राम मंदिर आहे, नामयोगी संत गोंदवलेकर महाराज स्थापित ‘थोरले राम मंदिर’ आणि ‘धाकटे राम मंदिर’ अशी दोन मंदिरे आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी बांधलेले पंढरपूरच्या महाद्वार घाटावर स्थापित राम मंदिर आहे. फलटणच्या राजे निंबाळकर स्थापित राम मंदिर आहे. पण, या सर्वांमध्ये नाशिकच्या काळाराम मंदिराचे स्थान एकमेवाद्वितीय आहे.

‘काळाराम’ नव्हे ‘काल’ राम
 
नाशिकच्या काळाराम मंदिराला फार मोठा इतिहास आहे. ‘श्री काळाराम मंदिर’ हे नाव अलीकडच्या काळात लोकरूढ झालेले नाव आहे. पूर्वी या मंदिराला ‘रघुराम मंदिर’, ‘श्री रामचंद्र संस्थान मंदिर’ म्हणून ओळखले जात होते. पण, नंतरच्या काळात पंचवटीच्या पावन परिसरात अनेक रामभक्तांनी श्रीरामाची अनेक छोटी-मोठी मंदिरे बांधून पुण्यकार्याची धन्यता प्राप्त केली. या अनेक मंदिरातील रामाच्या मूर्ती पांढर्‍या संगमरवरी असल्याने आणि मूळ रघुराम मंदिरातील, गोदावरीमध्ये मिळालेल्या राम-लक्ष्मण-सीतेच्या मूर्ती काळ्या वालुकामय पाषाणाच्या असल्याने भाविक या मंदिरास ‘श्री काळाराम मंदिर’ म्हणून ओळखू लागले व तेच नाव कालप्रवाहात रूढ झाले, असे म्हणतात. खरे तर हा ‘काळाराम’ शब्द रंगवाचक नसून, गुणवाचक आहे. तो शब्द ‘काळा’ नसून ‘काल’ (कर्दनकाळ) असा कार्यवाचक आहे. ईश्वराचे वर्णन ‘काळाग्नी’, ‘काळरूद्राग्नी’ अशा शब्दांमध्ये अनेक स्तुतीस्तोत्रामध्ये केलेले आहे. त्याअर्थाने हा ‘कालाराम’ आहे. शूर्पणखा भगिनीच्या अपमानाचा बदला घेण्यास आलेल्या राक्षस, खर, दूषण आणि 18 हजार राक्षससेनेचा प्रभू रामचंद्रांनी उग्र रूप धारण करून नायनाट केला. या उग्र रूपाला वीररूपालाच ‘काल रूप’ म्हणतात. राक्षसांसाठी राम कर्दनकाळ ठरला.

काळ्या पाषाणाचे मंदिर शिल्प : महाराष्ट्र वैभव

श्री काळाराम मंदिराच्या इतिहासाचा आढावा घेताना, आपणास इसवी सनाच्या आठव्या शतकात, या जागेवर एक लाकडी मंदिर होते असे दिसते. त्या लाकडी मंदिराचा तत्कालीन शंकराचार्यांनी जीर्णोद्धार केला आणि नव्याने विधिवत नित्योपचाराची नवी परंपरा सुरू केली. या काळात या मंदिराला ‘श्री रघुराम मंदिर’ म्हणून ओळखले जात होते. आपण आज जे काळ्या पाषाणाचे कोरीव सुंदर असे श्री काळाराम मंदिर पाहतो, ते इ. स. 1778 ते 1790 अशा बारा वर्षांच्या काळात बांधलेले आहे. पेशव्यांचे सरदार रंगनाथ ओढेकर यांनी श्रीमंत माधवराव पेशव्यांच्या मातोश्री गोपिकाबाईसाहेब यांच्या इच्छेनुसार या मंदिराचे बांधकाम करून घेतले. त्याकाळी त्यासाठी 32 लक्ष रुपये खर्च आला, असे इतिहासातील कागदपत्रातील नोंदीवरून कळते. नाशिकच्या ओढा या भागामध्ये सरदार रंगनाथपंत जहागीरदार होते. या मंदिर निर्माण कार्यासाठी सरदार ओढेकरांच्या पत्नीने आपली हिरेजडित नथ दान दिली होती व रामसेवेमध्ये खारुटीच्या सहभागाचे पुण्य मिळवले होते. हे मंदिर पूर्ण घडीव दगडाचे असून, हा सारा काळा पाषाण नाशिक जवळच्या डोंगरातून खोदून आणलेला आहे. अशाप्रकारे काळाराम मंदिराचे देखणे मंदिरशिल्प हे महाराष्ट्रातील पाषाण वैभव आहे.

इंद्राच्या ऐरावतालाही लाजवेल असे हे काळ्या पाषाणातील मंदिर, शिल्पकलेचा अद्वितीय, अनुपम असा देखणा आविष्कार आहे. त्र्यंबकेश्वरचे श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी बांधलेले त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आणि नाशिकचे काळाराम मंदिर या दोन्ही पाषाण शिल्पांच्या वैभवामध्ये विलक्षण साम्य आहे.

श्री काळाराम मंदिर हे पूर्वाभिमुख असून, 266 फूट लांब आणि 138 फूट रूंद आहे. मंदिराच्या भोवती भरभक्कम दगडी तटबंदी असून, चार दिशेला चार द्वारे आहेत. हे चार दरवाजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष अशा चार पुरुषार्थाचे प्रतीक आहेत. प्रांगणातील तटबंदीला लागून कडेने अनेक ओवर्‍या आहेत. त्याला 84 सुंदर कमानी आहेत. त्या 84 लक्ष योनीच्या प्रतीक मानल्या जातात. सुमारे आठ-दहा पायर्‍या चढून मुख्य राममंदिरात जावे लागते. मुख्य मंदिरात 40 खांबांचा भव्य मंडप आहे. या मंडपास पूर्व, दक्षिण, उत्तर अशी तीन प्रवेशद्वारे असून, ती सत्व, रज आणि तम या त्रिगुणांची प्रतिकरूप आहेत. मंदिराचा गाभारा अत्यंत प्रशस्त असून, गाभार्‍यात चौथर्‍यावर श्रीराम, सीता आणि लक्ष्मणाच्या सुंदर मूर्ती विराजमान आहेत. या मूर्ती गोदावरी नदीच्या प्रवाहात सापडलेल्या स्वयंभू मूर्ती आहेत. विशेष गोष्ट म्हणजे, श्रीरामाचा डावा हात सरळ पायाकडे असून, उजवा हात छातीवर आहे. पायी नतमस्तक होणार्‍या श्रद्धावंताला श्रीराम छातीवर हात ठेवून रक्षणाचे अभय देत आहे. म्हणून हा काळराम ‘अभयराम’ सुद्धा आहे. मंदिरावर उंच शिखर असून, सोन्याचा कळस चढवलेला आहे.
॥जय श्रीराम॥

विद्याधर ताठे
9881909775
(पुढील अंकात ः रामटेकचे राममंदिर)