महापालिका आयुक्तांनी घेतला मालमत्ता कर विभागाचा आढावा

    30-Nov-2024
Total Views |
Municipal corporation

उल्हासनगर : ‘उल्हासनगर महानगरपालिके’चे आयुक्त विकास ढाकणे यांनी मालमत्ता कर विभागाचा आढावा घेतला असून विभागातील कर्मचार्‍यांची कर आकारणी व कर संकलन याबद्दलची बौद्धिक पातळी, काम करण्याचा कार्यक्षमता व वसुलीच्या उदिष्टांच्या पूर्ततेसाठी लागणारी इतर क्षमता यांचा मेळ असणे आवश्यक असल्याचे त्यांचे निदर्शनास आले. त्यामुळे महापालिकेच्या ( Municipal Corporation ) आर्थिक हिताकरिता मालमत्ता कर विभागातील कर्मचार्‍यांनी त्यांच्या कामात सुधारणा करण्यासाठी मालमत्ता कर विभागातील सर्व कर्मचार्‍यांची तसेच महापालिकेतील इच्छुक लिपिक संवर्गातील कर्मचार्‍यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील मालमत्ता कराशी निगडित कलमे व नियम याचे विशेष प्रशिक्षण तसेच सामान्य बौद्धिक चाचणी परीक्षा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अकार्यक्षम कर्मचार्‍यांच्या बदल्यांमुळे रिक्त होणार्‍या पदान्वये महापालिकेतीलच इतर कर्मचार्‍यांची बदली करण्यात येईल. असे कर्मचारीदेखील कर विभागात काम करण्यास पात्र ठरण्याकरिता करविषयक ज्ञानाची परीक्षा घेऊन अशा कर्मचार्‍यांच्या गुणानुक्रमे येणार्‍या यादीनुसार सर्वोच्च गुण मिळवणार्‍या कर्मचार्‍यांची मालमत्ता कर विभागात बदली सर्वात प्रथम केली जाईल. त्यानंतर दुसरा, तिसरा यांप्रमाणे आवश्यक त्या बदल्या केल्या जातील. आवश्यक बदल्यांच्या नंतर उर्वरित यादी प्रतीक्षायादी म्हणून राखीव ठेवली जाईल. तसेच आवश्यकतेनुसार त्यातील कर्मचारी कर विभागाकडे पुरविले जातील, असे यावेळी सांगण्यात आले.