‘गगनयान’यात्रींच्या प्रशिक्षणाचा प्राथमिक टप्पा पूर्ण
30-Nov-2024
Total Views |
नवी दिल्ली : भारताची पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम असलेल्या ’गगनयान’साठीची ( Gaganyan ) जय्यत तयारी सुरू आहे. या मोहिमेचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिला टप्पा नुकताच पार पडल्याची माहिती ‘भारतीय अवकाश संशोधन संस्थे’ने (इस्त्रो) शुक्रवार, दि. २९ ‘एक्स’ अकाऊंटवरून दिली आहे.
‘इस्त्रो’ने म्हटले आहे की, भारताच्या ‘गगनयान’ मोहिमेची जागतिक स्तरावर वाटचाल सुरू आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या ऐतिहासिक ‘इस्त्रो’-‘नासा’ संयुक्त मोहिमेचा भाग असलेल्या गगनयात्रींसाठी प्रशिक्षणाचा प्रारंभिक टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. ‘गगनयान’ मोहिमेतील प्राइम क्रू ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला आणि बॅकअप क्रू ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर हे दोघे गगनयात्री या प्रशिक्षणामध्ये सहभागी होते, असेदेखील ‘इस्रो’ने म्हटले आहे.
‘गगनयान’ मोहिमेतील काही प्रमुख टप्पे पार पडल्याची माहितीदेखील ‘इस्रो’ने दिली. यामध्ये स्पेस ‘एक्स’ सूट फिट आहे का तपासणे, स्पेस फूड सिलेक्शन, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक आणि ड्रॅगन स्पेसक्राफ्ट परिचय तसेच आपत्कालीन आणि वैद्यकीय प्रतिसाद प्रशिक्षण यांसारखे प्रारंभिक टप्पे पार पडल्याचे ‘भारतीय अवकाश संशोधन संस्थे’ने म्हटले आहे.
यापुढे ‘गगनयान’ मोहिमेतील ‘यू. एस. ऑर्बिटल सेगमेंट’ आणि ‘मायक्रोग्रॅविटी संशोधना’वर प्रगत प्रशिक्षण पार पडणार आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय अंतराळ सहयोगात भारताची अवकाश संशोधनातील झेप सुरूच असल्याचेदेखील ‘इस्रो’ने केलेल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे.