गाभारा : मंदिरांचा समृद्ध वारसा

    30-Nov-2024
Total Views |
gabhara mandirancha samruddh varsa
 


एक तरुण तडफदार युवा लेखक सर्वेश फडणवीस! त्यांचे पहिले वहिले पुस्तक ‘गाभारा-मंदिरांचा समृद्ध वारसा.’ हे पुस्तक हाती पडताच ते पूर्ण झाल्यावरच खाली ठेवले. खरे तर हे लेखकाचे पहिले पुस्तक आहे. पण, आशय मात्र खूप मोठा आहे. हे पुस्तक वाचायला घेतले आणि मनात अनेक प्रश्न उमटत गेले. त्याची उत्तरेही आपसूक मिळाली.

मंदिरे ही भारतीय संस्कृतीचा आत्मा आहेत. परमप्रिय भगवंताचे घर ते! परमप्रियच! कारण कुणी नसते, तेव्हा ‘तो’ असतो. त्याला आईसारखी मिठी मारता येते, वडिलांवर लाडाने रागे भरावे तसे रागे भरता येतात, प्रियकरासारखे प्रेम करता येते, पुत्रासारखे आंजारता, गोंजारता, सजवता येते, मित्रासारखा जाब विचारता येतो, त्याच्याच कुशीत ढसाढसा रडता येते आणि त्याच्याच मंदिरातल्या गर्भगृहात अर्भक होऊन राहताही येते. कारण, तिथे ‘तो‘ असतो.

ही मंदिरे कलाकारांनी आपापल्या कल्पनाशक्तीने, कौशल्याने, कलेने रेखली, सजवली आणि देखणी केली. अचंब्याने तोंडात बोटे घालावी इतकी सुंदर केली. एकमेवाद्वितीय अशा स्वरूपाची केली. अशाच हृदयस्थ मंदिरांचा समृद्ध वारसा म्हणजे सर्वेश फडणवीस लिखित ‘गाभारा-मंदिरांचा समृद्ध वारसा‘ हे पुस्तक.
 
शुभ्र पांढर्‍या पार्श्वभूमीवर, हिरवळीच्या महिरपीत उभे असलेले मंदिराच्या दाराचे चित्र मुखपृष्ठावर आहे. मंदिरात जाणार्‍या चार पायर्‍या, बाजूला उभे असलेले झाड, मंदिराच्या भिंतीलगतची खुरटी हिरवळ हे सारे मंदिराचे सौंदर्य वाढवतात. मंदिराच्या आतली देवता दृगगोचर नाही. आत काळोख आहे, तो पार करूनच तुम्हाला आत जावे लागेल. मग ‘तो‘ दिसेल, असे चित्रांकित आहे. मुखपृष्ठ आणि आतील चित्रेही प्रदीप फडणवीस यांची आहेत. मलपृष्ठावर लेखकाचा थोडक्यात परिचय आणि प्रस्तावनाकार डॉ. धनश्री लेले यांची पुस्तकाला लाभलेली प्रस्तावना थोडक्यात दिली आहे. खरे तर ‘गाभारा-मंदिरांचा समृद्ध वारसा’ ही लेखमाला आहे. साधारणपणे 2021 -2022 साली वर्षभर दै. ‘सोलापूर तरुण भारत’मधल्या ‘आसमंत’ पुरवणीत प्राचीन मंदिरांची ओळख रूपाने ही लेखमाला प्रसिद्ध झाली. त्या लेखमालेचेच हे पुस्तक रूप.

या पुस्तकाला सुप्रसिद्ध निवेदिका, लेखिका, विदुषी डॉ. धनश्री लेले यांची प्रस्तावना लाभली आहे. लेखकाच्या मनोगत आणि ऋणनिर्देशानंतर प. पू. शिरीष शांताराम कवडे यांचे आशीर्वाद लाभले आहेत. त्यानंतर लेखमाला सुरू होते. 53 लेख असलेल्या या पुस्तकाचे स्वरूप आहे. तुळजाभवानी मंदिर, तुळजापूर या मंदिरावरील पहिला लेख, तर श्रीराम जन्मभूमी मंदिर हा अंतिम लेख आहे.
 
महाराष्ट्रातील 43, गोवा प्रांतातील तीन, कर्नाटकातील एक, तेलंगणमधील एक, मध्य प्रदेशातील दोन, उत्तर प्रदेशातील दोन, ओडिशामधील एक अशाप्रकारे एकूण वर्णन आढळते. अशी एकूण लेखांची संख्या 53 असली, तरी ओघाओघाने मूळ मंदिरांसोबत काही आजूबाजूच्या इतर मंदिरांचे वर्णन केलेले आहे. जसे भंडारा मंदिर समूह, भद्रावती गणपती मंदिर, पवनी मंदिर समूह सर्वांचे प्रिय आणि आद्य दैवत असलेल्या श्री गणेशाच्या दहा मंदिरांचे वर्णन आहे. भंडारा (दोन), पवनी, भद्रावती, आदासा, नागपूर, रामटेक, पुणे, केळझर, कळंब या ठिकाणची ही मंदिरे आहेत. भंडाराचे सर्वतोभद्र गणेश शिल्प आणि आठ फूट उंचीची श्री भुशुंडाची गणेशमूर्ती, भद्रावतीची गृत्समद ऋषींनी स्थापन केलेली नवसाला पावणारी श्री वरदविनायकाची मूर्ती, आदास्याची भीमकाय भालचंद्र शमीविघ्नेशाची मूर्ती, नागपूर नगरीचे आराध्य दैवत हृदयस्थ टेकडीवरचा गणपती, रामटेकचे अठरा भुजा असलेले श्री गणेशाचे प्राचीन मंदिर, पुणे नगरीची ग्रामदेवता, प्राचीन इतिहासाची साक्ष देत असलेला कसब्याचा गणपती, वर्धा आणि नागपूरच्या मध्ये असलेला वसिष्ठ ऋषींनी स्थापन केलेला एकचक्रा नगरी अर्थात केळझरचा एकचक्रा गणेश, दर बारा वर्षांनी कुंडातील पाणी (गंगा) ज्याच्या पादक्षालना करिता येते, तो भक्तांना चिंतामुक्त करणारा कळंबचा श्री चिंतामणी या पुस्तकात आपल्याला एकत्रितपणे दर्शन देतात.

आदिशक्ती, आदिमाया लेकरांची प्रेमळ माता निरनिराळ्या रुपात भक्तांचा सांभाळ करण्याकरिता कायम सज्ज असते. भगवती स्वरूप तिचे ही दर्शन आपल्याला इथेच होते. अमरावतीची अंबाबाई, अंबेजोगाईची श्री योगेश्वरी, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई, पारशिवनीची महालक्ष्मी, नांदुरीची श्री सप्तशृंगी, माहूरची रेणुका माता, केळापूरची श्री जगदंबा माता, नेर पिंगळाईची पिंगळाई माता, कोवळे फोंडाची श्री शांता दुर्गा, म्हादोळची श्री म्हाळसा नारायणी! अमरावतीच्या अंबादेवी सोबत श्री एकवीराही वर्णिली जातेच. प्रत्येकीचे रूप वेगळे, कार्य वेगळे, पण लेकरांप्रती भाव मात्र तोच अपर वात्सल्याचा. विद्येची देवता सरस्वतीच्या श्री ज्ञान सरस्वती बासरचेही वर्णन इथे केलेले आहे. महाल-नागपूरचे श्री रूक्मिणी मंदिर उत्कृष्ट शिल्प कलेचा नमुना म्हणून लेखकाने उद्धृत केले आहे. मातृतुल्य नदी नर्मदा. निसर्गाला ही देवता रुपात बघणारी आपली संस्कृती. त्या दृष्टीने अमरकंटकचे नर्मदा देवी उगमस्थान हा लेख विशेष ठरतो. अशाप्रकारे एकूण 14 देवी मंदिरे आपल्याला या पुस्तकात बघायला मिळतात.

याच आदिमाया सोबतच भक्तांना ठामपणे सावरणारा, आधार देणारा तारणहार भगवान विष्णूही कधी विष्णू अवतारात, कधी कृष्ण अवतारात, कधी रामावतारात भक्तांना सुखी करतो. प्रस्तुत पुस्तकात एकूण पाच विष्णू मंदिरांचा संदर्भ आहे. नेवासा-अहिल्यानगरचे मोहिनी राज मंदिर, मेहकर-बुलढाण्याचे शारंगधर बालाजी मंदिर, लोणारचे दैत्यसूदन मंदिर, रामटेकचे त्रिविक्रम मंदिर आणि वत्सगुल्म वाशिमचे बालाजी मंदिर याच्याविषयी लेखन आढळते.

केवलनृसिंह मंदिर, रामटेक आणि यवतमाळचे श्री नृसिंह मंदिर या मंदिरांचा विष्णूच्या नृसिंह रूपातील दोन वर्णने त्यात पाहायला मिळतात.भगवान कृष्णाच्या सोनेगाव, नागपूर येथील मुरलीधर मंदिराचे वर्णन तर आपल्याला थेट गाभार्‍यात नेते. रामटेकचे रामचंद्र गड मंदिर संपूर्ण विदर्भाकरिता आराध्य आहे. तिथला त्रिपुरी पौर्णिमेचा उत्सव, श्रीराम जन्मोत्सव सुप्रसिद्ध आहे. चाफळचे श्रीराम मंदिर, सज्जनगडचे रामदासस्वामी संस्थान आणि तेथील श्रीराम मंदिर, त्याच्या अनुषंगाने अंगाई देवी, समर्थ रामदास स्वामी यांचे वर्णन लेखकाने अत्यंत औचित्याने केले आहे.

प्रत्येक भारतीयाचे प्राण आणि स्वप्न म्हणजे अयोध्येचे श्री रामजन्मभूमी मंदिर. हा लेख साधारणपणे 2022 सालामधला असल्याने आताच्या स्थितीत तो कालबाह्य वाटतो. पण, भावना आणि वर्णन तेवढेच उत्कट आहे, यात शंका नाही. अशी ही एकूण चार रामाची मंदिरे. प्रभू श्रीरामांनंतर उल्लेख यावा तो परमभक्त हनुमंताचा. छिंदवाड्याचा-जामसावळीचा झोपलेला मारुती, त्याच्या पायाजवळचा जिवंत झरा आणि भक्त आणि पर्यटकांची गर्दी याचे यथार्थ वर्णन वाचकांना अनुभवता येते.

अवघ्या महाराष्ट्राचे आद्यदैवत असलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिर, या पंढरपूरच्या मंदिराचे वर्णन न आले तर नवलच. कटीवर दोन्ही हात ठेवलेला, एकही आयुध हाती नसलेला, केवळ नजरेने गोंजारणारा विठोबा आणि त्याची सावली जणू ती रखुमाई, अशा नेमक्या शब्दात लेखकाने विठूरायाचे दर्शन या लेखातून घडवले आहे. विदर्भाचे पंढरपूर असलेले धापेवाडा, कोलबा स्वामी, चंद्रभागा नदी याचे छान वर्णन केले आहे. शिवाय कौंडण्यपूरचे रुक्मिणी मंदिर लक्ष वेधून घेणारे आहे. शेषशायी विष्णू, लक्ष्मी त्यांचे पाय चेपीत आहेत आणि देवदेवता पुष्प वर्षाव करीत आहेत. अहाहा!

गाणगापूरचे दत्त मंदिर, अक्कलकोटचे स्वामी समर्थ मंदिर, आळंदीचे संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी मंदिर, बहिरमचे बहिरम बाबा मंदिर, मुक्तागिरीचे निसर्गाने नटलेले मुक्तागिरी जैन मंदिर आपल्या मंदिरांबद्दलाची उत्सुकता आणखी तीव्र करतात. एकमेवाद्वितीय असे कोणार्कचे सूर्य मंदिर! देखणी मूर्ती, देखणी वास्तू आणि देखणे वर्णन!

आशुतोष शिवाची मंदिरे तर संपूर्ण भारताची जणू जीवनरेखा आहेत. ती ज्योतिर्लिंग आहेत. प्रस्तुत लेखात शिवाच्या एकूण सात मंदिरांचा संदर्भ देण्यात आला आहे. चैतन्येश्वर महादेव मंदिर-अंभोरा, भोंडा महादेव मंदिर बर्डी नागपूर, कोटेश्वर शिव मंदिर रामटेक, मंगेश मंदिर फोंडा, भीमाशंकर मंदिर, पुणे आणि काशी विश्वनाथ मंदिर वाराणसी याशिवाय खंडोबा देवस्थान जेजुरीचेही वर्णन केले आहे.

प्रस्तुत पुस्तकाची भाषा साधी, सोपी, ओघवती आहे. प्रत्येक मंदिराचे वर्णन करताना त्याचा थोडक्यात इतिहास, स्थापत्य शैली, प्रभाव, तत्कालीन प्रशासन, मंदिरांचा पुनर्निर्माण व जीर्णोद्धार, मंदिराशी संबंधित काही दंतकथा यांचा आढावा घेण्यात आला आहे. काही मंदिरांचा परस्परांशी संबंध आहे. त्यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. लेख लिहिताना सुरुवातीला ‘तत् तत् देवता’ विषयक शीर्षक हे अत्यंत रोचक पद्धतीने लिहिण्यात आले आहे. स्तोत्र, कविता, आरती, अभंग, भजन यातील संबंधित एखादी ओळ लेखाचे शीर्षक बनते आणि वाचकाचे मन आकर्षित करते. एवढ्या प्रचंड अशा समृद्ध संस्कृतीचे आपण वारसदार असूनही आपल्याला त्याचे मोल कळू नये, यावर लेखक एखाद्या लेखातून खेद व्यक्त करतो. प्रत्येक लेखासोबत त्या त्या मंदिरांची छायाचित्रे जोडली आहेत. त्याने लेख पटकन समजतो. लेखकाची विषयातली गोडी, विषयाचा आवाका, त्याकरिता केलेला प्रवास या सगळ्याचे फलित म्हणजे हे पुस्तक आहे. पुस्तक अत्यंत संग्राह्य असून, भविष्यात एखाद्या मंदिरात जाताना एखादातरी हे पुस्तक वाचून जावे, अशा धाटणीचे आहे.

सदर पुस्तकात बरेचसे शब्द हे मंदिर आणि स्थापत्य कलेशी संबंधित आहेत. सामान्य वाचकाला त्याचा अर्थ लावून घ्यावा लागतो. लेखकाने संदर्भ सूचीप्रमाणे मागे त्या शब्दांचा प्रचलित अर्थ दिला असता, तर आणखी सोपे झाले असते, असे माझे मत आहे.

एकूणच ‘गाभारा-मंदिरांचा समृद्ध वारसा’ हे पुस्तक अत्यंत वाचनीय, संग्राह्य आणि उत्सुकता वाढवणारे आहे. हे पुस्तक ‘ई-बुक’ रुपात ही उपलब्ध आहे. लेखक सर्वेश फडणवीस यांचे मनापासून अभिनंदन!
 
पुस्तकाचे नाव : गाभारा : मंदिरांचा समृद्ध वारसा
लेखक : सर्वेश फडणवीस
प्रकाशक : बुकगंगा पब्लिकेशन्स , पुणे
पृष्ठसंख्या : 246
मूल्य : 260 रुपये
अधिक माहितीसाठी संपर्क : 8888300300


डॉ. प्रगती वाघमारे
9822700812