विधानसभा निवडणुकीतील यशासाठी फडणवीसांकडून नरेंद्र पवार यांचे कौतुक

30 Nov 2024 13:15:38
Narendra Pawar

कल्याण : विधानसभा निवडणुकीत राज्यभरात महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. कल्याण पश्चिमेतील भाजपचे नेते आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांनी शुक्रवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस ( Fadanvis ) यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले, तर यावेळी कल्याण पश्चिम आणि उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांच्या विजयाबद्दल फडणवीसांकडून नरेंद्र पवार यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात आली.

“नुकताच विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून भाजपसह महायुतीच्या या महाविजयामध्ये भाजपचे ‘फायरब्रँड’ नेते देवेंद्र फडणवीस यांचा सिंहाचा वाटा आहे. भाजपला ही सुवर्ण कामगिरी करून दिल्याबद्दल कल्याण पश्चिमेतील भाजप नेते आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले. तसेच, या विजयाने राज्यभरातील भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला असून आगामी महापालिका निवडणुकीतही हीच पुनरावृत्ती करण्यासाठी तो सज्ज आहे,” असे नरेंद्र पवार यांनी यावेळी फडणवीस यांना सांगितले.

भाजप पक्षश्रेष्ठींकडून माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या खांद्यावर कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघासह उल्हासनगर विधानसभेचे प्रभारीपद देण्यात आले होते. या दोन्ही ठिकाणी महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर आणि कुमार आयलानी यांना घवघवीत यश मिळाले आहे. या यशाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी माजी आमदार नरेंद्र पवार यांचे विशेष कौतुक करत पाठीवर शाबासकीची थापही दिली.

Powered By Sangraha 9.0