काँग्रेसच्या आरोपांवर निवडणूक आयोग देणार उत्तर

30 Nov 2024 19:08:09
Election commission

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतदारांची नोंद आणि मतदानाच्या टक्केवारीबाबत काँग्रेसच्या ( Congress ) भीतीचे निराकरण करण्यासाठी, निवडणूक आयोगाने त्यांच्या शिष्टमंडळाला ३ डिसेंबरला भेटण्यासाठी आमंत्रित केले आहे. निवडणूक आयोगाने म्हटले आहे की ते काँग्रेसच्या सर्व न्याय्य चिंतांचा आढावा घेईल आणि पक्षाच्या शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून लेखी उत्तर देईल.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील आकडेवारीतील कथित तफावतप्रकरणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे धाव घेत उत्तर मागितले आहे. काँग्रेसच्या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या शिष्टमंडळाला पाचारण केले आहे. आयोगाने काँग्रेसच्या शिष्टमंडळाला सोमवारी बैठकीसाठी बोलावले आहे. आयोगाने आपल्या सुरुवातीच्या उत्तरात निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर भर दिला आहे. निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या सर्व न्याय्य समस्यांचा आढावा घेण्याचे आणि त्यांचे म्हणणे ऐकून लेखी उत्तर देण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय मतदार यादी अद्ययावतीकरणाच्या प्रक्रियेत राजकीय पक्षांचा सहभाग आणि पारदर्शकता यावरही भर देण्यात आला आहे.

मतदानाच्या आकडेवारीत कोणतीही अनियमितता नसल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. ही आकडेवारी र्व उमेदवारांना मतदान केंद्रानुसार उपलब्ध आहे आणि ती तपासली जाऊ शकते. साय़ंकाळी ५ वाजेची आकडेवारी आणि अंतिम मतदान आकडेवारीमधील फरक प्रक्रियात्मक प्राधान्यांमुळे आहे. पीठासीन अधिकाऱ्यांना मतदान संपण्यापूर्वी अनेक कायदेशीर कर्तव्ये पार पाडावी लागतात. त्यानंतरच ते मतदानाची आकडेवारी अद्यतनित करतात. यापूर्वी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान निवडणूक आयोगाने रात्री पावणेबारा वाजता एक प्रेस नोट जारी केली होती. अतिरिक्त माहिती प्रदान करण्याचा हा एक मार्ग होता. त्यानंतर सर्वच विधानसभा निवडणुकीत हेच झाले आहे, असेगही आयोगाने म्हटले आहे.

Powered By Sangraha 9.0