दरवेळी अंगावर पाऊस पडल्याने...; संजय शिरसाटांचा पवार-ठाकरेंना टोला
30-Nov-2024
Total Views |
मुंबई : दरवेळी अंगावर पाऊस पडल्याने तुम्ही निवडून येणार, असं होत नाही. तसेच दरवेळी सहानुभूतीची लाटही राहात नाही, असा टोला शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना लगावला आहे. शनिवार, ३० नोव्हेंबर रोजी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.
संजय शिरसाट म्हणाले की, "आता हरले आहात तर जिंकलेल्यांचे अभिनंदन करा. दरवेळी तुमच्या अंगावर पाऊस पडल्याने तुम्ही निवडून येणार आहात का? एखाद्यावेळी अशी घटना घडते. पाऊस पडला की, आपण निवडून येतो किंवा सहानुभूतीची लाट कायमच राहते, असे नाही. त्यांनी काहीही कामं केली नाहीत. त्यांना फक्त सहानुभूती हा शब्द कळतो. बाप चोरला, पक्ष, चिन्ह चोरला असे ते म्हणतात. पण सहानुभूतीवर राजकारण चालत नाही तर त्यासाठी लोकांची सेवा करावी लागते."
ते पुढे म्हणाले की, "सत्ता स्थापनेचा तिढा जवळपास सुटला असून लवकरच सत्ता स्थापन होईल. एकनाथ शिंदे दरेगावला गेलेत. तिथे काय करतील, हा सगळा सस्पेंस तयार करून महायूतीत बिघाडी होते का? असं चित्र इतरांच्या डोक्यात सुरु आहे. पण तसे काहीही होणार नसून महायूती मजबुतीने आपले सरकार स्थापन करेल. मुख्यमंत्री असतानासुद्धा शिंदे साहेब दरेगावला जायचे. त्यावेळी काही लोकं त्यांना म्हणायचे की, हेलिकॉप्टरने शेती करायला गेले तर काही म्हणायचे की, त्यांच्यावर काहीतरी संकट येणार आहे. परंतू, ते एकनाथ शिंदे आहेत. ज्यावेळी त्यांना एखादा निर्णय घ्यायचा असतो त्यावेळी अत्यंत शांतपणे निर्णय घेण्यासाठी ते दरेगावला गेले. तिथे ते निर्णय घेतील आणि इथे आल्यावर आम्हाला कळवतील," असेही त्यांनी सांगितले.
विरोधकांनी सामुहिक आत्महत्या करावी!
संजय राऊतांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना शिरसाट म्हणाले की, "सर्वांना आता सामुहिक आत्महत्या हा सार्वजनिक कार्यक्रम करण्याची गरज आहे. राजकीय आत्महत्या झाली आता त्यांनी सामुहिक आत्महत्या करावी. त्यामुळे कमीत कमी महाराष्ट्राचे पाप तरी धुतले जाईल," असे ते म्हणाले.