अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पुण्यावरून रेल्वेची व्यवस्था

    30-Nov-2024
Total Views |

railway
 
पुणे : दिल्लीत होणाऱ्या ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पुणे ते दिल्ली विशेष रेल्वेची व्यवस्था करण्याच्या सूचना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. याकरिता केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या ‘एक्स’ अकाऊंटवरून यासंबंधीची माहिती दिली आहे.
“अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पुणे-दिल्ली-पुणे विशेष रेल्वेची व्यवस्था! देशाच्या राजधानीत म्हणजेच दिल्लीत ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात येत असून ही समस्त मराठीजनांसाठी अभिमानाची बाब आहे. २१, २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ रोजी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो साहित्यिक सहभागी होणार आहेत. यानिमित्ताने साहित्यिकांच्या प्रवासाच्या सोयीसाठी पुणे ते नवी दिल्ली दरम्यान १९ फेब्रुवारी २०२५ रोजी आणि नवी दिल्ली ते पुणे दरम्यान २४ फेब्रुवारी २०२५ रोजी विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात यावी, अशी विनंती केंद्रीय रेल्वे मंत्री श्री. अश्विनी वैष्णव जी यांच्याकडे केली. माझ्या विनंतीचा मान राखून त्याची सकारात्मक दखल घेत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी विशेष गाडीची तरतूद करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना श्री. वैष्णव जी यांनी दिल्या आहेत. श्री. वैष्णव जी यांच्या या सकारात्मक पाऊलाबद्दल समस्त साहित्यिकांच्या आणि मराठीजनांच्या वतीने मी मनःपूर्वक आभार मानतो!
मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा आणि देशाच्या राजधानीत होत असलेले हे संमेलन निश्चितच प्रत्येक मराठी माणसाला आनंद देणारे असणार आहे.” असे मोहोळ यांनी एक्सवर लिहिले आहे.