दिवाळीत ठाण्याची हवा मध्यम मध्यम...

03 Nov 2024 19:23:20
Thane weather

ठाणे : ( Thane weather ) ठाणे शहरात दिवाळीनिमित्त फटाक्यांची आतषबाजी सुरू असल्यामुळे हवा गुणवत्ता निर्देशांक १९० वर पोहचला आहे तर, आवाजाची पातळी ८४ डेसिबल एवढी सर्वाधिक मोजण्यात आली आहे. मात्र, हरित फटाके फोडण्याकडे ठाणेकरांचा कल वाढल्याने गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत हवा आणि ध्वनी प्रदुषण तुलनेने कमी झाल्याचा तसेच धुलीकणांचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे यंदा ठाण्याची हवा मध्यम प्रदुषित वर्गवारीत असल्याचा दावा ठाणे महापालिकेच्या प्रदुषण नियंत्रण विभागाने केला आहे.

ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाद्वारे दिपावली पूर्व व दिपावली कालावधीत ठाणे महापालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता तपासण्यात आली. यावर्षी, हरित फटाक्यांचे प्रमाण वाढल्याने, हवेतील धूलीकणांचे प्रमाण १६५ (µg/m³) मायक्रोग्राम प्रति घनमीटर एवढे आढळले आहे. ते २०२२ मध्ये २४५ आणि २०२३ मध्ये २३० मायक्रोग्राम प्रति घनमीटर एवढे होते. दिवाळी पूर्व काळात १२७ वर असलेला हवा गुणवत्ता निर्देशांक, दिवाळीच्या काळात १९० एवढा नोंदवण्यात आला आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक मध्यम प्रदूषित या वर्गवारीमध्ये आहे.

नागरिकांद्वारे दिवाळी सण उत्स्फुर्तपणे साजरा करण्यात आला असून, याकाळात फटाके वाजण्याच्या प्रमाणात देखील वाढ झालेली निदर्शनास आली. या काळात, आवाजाची पातळी ८४ डेसिबल एवढी सर्वाधिक मोजण्यात आली. दिवाळी पूर्व काळात ती ७१ डेसिबल एवढी होती. मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान, उप पर्यावरण अधिकारी विद्या सावंत आणि ज्युनियर केमिस्ट निर्मिती साळगावकर यांच्या टीमने हवेच्या गुणवत्तेचा आणि ध्वनी प्रदूषणाचा अभ्यास केला.

ध्वनी आणि हवा प्रदूषणात वाढ

गेल्या वर्षी प्रमाणेच यंदाही नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले. हरित फटाक्यांचा वापर वाढला आहे. या वर्षीच्या अभ्यासात दिवाळीच्या काळात ध्वनी आणि वायू या दोन्हीत वाढ नोंदली गेली. मात्र हे प्रमाण गेल्या दोन वर्षांपेक्षा कमी आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक १९० पर्यंत वाढला असला तरी ठाण्याची हवा मध्यम प्रदूषित स्तरावर आहे.

- मनीषा प्रधान, मुख्य पर्यावरण अधिकारी, ठामपा


Powered By Sangraha 9.0