बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकुरांना धक्का; 'शिट्टी' निशाणी जनता दल युनायटेडच्या पदरात

03 Nov 2024 20:35:56

BVA
 
मुंबई : ( ECI on BVA Symbol Whistle )राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली असून अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली आहे. यानंतर आता ४ नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. या पार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष असलेल्या हितेंद्र ठाकूर यांना मोठा धक्का बसला आहे.
 
विधानसभा निवडणुकीसाठी बहुजन विकास आघाडीचे शिट्टी हे निवडणूक चिन्ह जनता दल (युनायटेड) या पक्षासाठी आरक्षित ठेवण्याच्या सूचना भारत निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे बहुजन विकास आघाडी सह इतर नोंदणीकृत राजकीय पक्ष तसेच अपक्षांना शिट्टी या चिन्हाचा वापर करता येणार नसल्यामुळे निवडणुकीसाठी नव्या चिन्हाचा शोध घ्यावा लागणार आहे.
 
यासंदर्भात निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांना ३० जानेवारी २०२४ रोजी पत्र पाठवून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी शिट्टी हे चिन्ह जनता दल (युनायटेड) या पक्षासाठी राखीव असल्याचे स्पष्ट केले होते. त्या अनुषंगाने २ फेब्रुवारी २०२४ रोजी या आशयाच्या सूचना जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. मात्र लोकसभा निवडणुकीत जनता दल (युनायटेड) या पक्षाने उमेदवारी दाखल न केल्याने या चिन्हाचा वापर बहुजन विकास आघाडीने पालघर लोकसभा जागेसाठी केला होता.
 
भारत निवडणूक आयोगाने २३ मार्च २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेमध्ये शिट्टी या चिन्हाचा समावेश मुक्त चिन्हांच्या यादीमध्ये समावेश केला होता. त्यामुळे निवडणूक चिन्ह कायदा १९६८ मधील तरतुदीच्या आधारे विधानसभा निवडणुकीसाठी अनेक उमेदवारांनी या चिन्हाची मागणी केली होती. त्यामुळे राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी ३१ ऑक्टोबर रोजी भारत निवडणूक आयोगाकडे या संदर्भात मार्गदर्शन करण्याची विनंती केली होती. तसेच भारत निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटले होते की, राजकीय पक्षांसाठी राखीव चिन्हांचा समावेश मुक्त चिन्हांच्या यादीत समाविष्ट करू नये. तसेच यासंदर्भातील कायद्यात स्पष्ट तरतूद असताना शिट्टी या चिन्हाचा मुक्त चिन्ह यादीत समाविष्ट करण्यात आल्याकडेही राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले होते.
 
बविआच्या उमेदवारांना नवीन चिन्ह शोधावे लागणार
 
दरम्यान, राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी दि. १ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी तातडीने उत्तर देताना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिट्टी हे चिन्ह जनता दल (युनायटेड) या पक्षासाठी राखीव ठेवण्याचे स्पष्ट केले. तसेच हे चिन्ह इतर राजकीय पक्ष अथवा अपक्षांना देण्यात येऊ नये असेही सूचित केले आहे. त्यामुळे वसई, नालासोपारा आणि बोईसर या ठिकाणी शिट्टी या चिन्हावर निवडणूक लढवलेल्या बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांना आता नवीन चिन्ह शोधावे लागणार आहे.
 
बविआचे हितेंद्र ठाकुर यांची प्रतिक्रिया
 
"आमची निशाणी चोरण्याचा अनुभव नवीन नाही. चिन्ह बदललं तर आम्ही जिंकणार नाही हा गैरसमज आहे. माझे कार्यकर्ते मिळेल ते चिन्ह सोशल मीडिया व इतर माध्यमांतून एक दिवसात घराघरात पोहोचवतील", असा विश्वास हितेंद्र ठाकुरांनी व्यक्त केला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0