लोकसभेला खोटे नॅरेटीव्ह चालले विधानसभेला झिरो झाले

खोट्या नॅरेटीव्हचा फटका कसा बसतो हे विरोधकांना कळले - आमदार संजय केळकर

    29-Nov-2024
Total Views |
Sanjay Kelkar

ठाणे : लोकसभा निवडणुकीत विरोधकांचे खोटे नॅरेटीव्ह चालले. पण विधानसभा निवडणुकीत झिरो झाले.तेव्हा, खोट्या नॅरेटीव्हचा फटका कसा बसतो हे विरोधकांना कळले असेल. अशी शालजोडीतील टीका आमदार संजय केळकर ( MLA Kelkar ) यांनी मविआवर केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम बाबत स्पष्टता केल्यानंतरही तक्रारी करणाऱ्या विरोधकांनी आत्मपरिक्षण करावे. असा सल्लाही आमदार केळकर यांनी दिला आहे.

ठाणे शहर विधानसभा क्षेत्रातुन मविआ आघाडीसह मनसेचे पानिपत करून ५८ हजारांच्या मताधिक्याने निवडून आलेल्या भाजपच्या आमदार संजय केळकर यांनी, शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान होण्याचा क्षण भाजपच्या तमाम कार्यकर्त्यासाठी आनंदाचा क्षण असल्याचे सांगत अडिच वर्षापूर्वी फडणवीस यांनी वरिष्ठांचा निर्णय खिलाडु वृत्तीने स्विकारल्याची आठवण जागवली. विरोधक ईव्हीएम आणि मतमोजणीवर आक्षेप नोंदवत असल्याबाबत विचारले असता आमदार केळकर यांनी, सर्वोच्च न्यायालयाने याबाबत स्पष्टता केल्यानंतरही ही मंडळी अजूनही मतमोजणी आणि ईव्हीएम मध्येच आहेत. त्यांना दुसरा काही विषयच नाही.खरे म्हणजे विरोधकांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. सारखे सारखे खोटे नरेटिव वापरले तर कसा फटका बसतो, हे त्यांना आता कळले असेलच. तेव्हा विरोधकांनी बोलत राहावे, तेवढाच जनतेचा रोष पुढच्या काळात पण त्यांना पाहायला मिळेल. असे भाकितही आमदार केळकर यांनी केले.

ठाण्यात दोन लाख सदस्य नोंदणीचे लक्ष्य

भाजप ही जगातील सर्वात मोठी संघटना असुन करोडोंच्या संख्येने भाजपचे सदस्य आहेत. भाजपचे एकुण १४ कोटी प्राथमिक सदस्य आहेत. मेरा बूथ सबसे मजबूत करून विजयाला गवसणी घातली. आता आमचे सैन्य कामाला लागले असुन ठाण्यात आम्ही २ लाखाच्यावर प्राथमिक सदस्य करण्याचे लक्ष्य ठेवल्याचे आमदार केळकर म्हणाले.