नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांविषयीची निर्णायक बैठक गुरुवार दि. २८ नोव्हेंबर रोजी रात्री केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह ( Amit Shah ) यांच्या निवासस्थानी झाली. यानंतर आता आजच मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.
राज्याच्या मुख्यमंत्रीपदाविषयी दिल्लीत अतिशय महत्त्वाची बैठक झाली. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवारी दिल्लीत दाखल झाले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नवी दिल्लीतील कृष्णमेनन मार्गावरील निवासस्थानी तिन्ही नेत्यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी साधारणपणे १०च्या सुमारास बैठकीस प्रारंभ झाला, बैठक रात्री साडेअकरा वाजेनंतरही सुरूच होती. बैठकीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डादेखील उपस्थित होते. बैठकीत प्रामुख्याने महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर अंतिम आणि निर्णायक चर्चा झाली. त्यानंतर आता आज अथवा येत्या एक ते दोन दिवसात मुख्यमंत्र्यांची घोषणा होऊन शपथविधी सोहळा पार पडणार आहे. बैठकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना नव्या सरकारमध्ये किती आणि प्रतिनिधीत्व मिळणार, तसेच कोणत्या दोन्ही पक्षांना कोणती खाती मिळणार यावरही अंतिम चर्चा झाल्याचे समजते. दरम्यान, मुख्य बैठकीपूर्वी प्रथम काळजीवाहू मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यातही बैठक झाली. त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातही चर्चा झाली.