‘किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’ची उत्साहात सांगता
29-Nov-2024
Total Views |
नाशिक : ‘किर्लोस्कर ( Kirloskar ) वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२४’ चा समारोप सोहळा नुकताच ‘मराठा विद्याप्रसारक समाजच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थे’त मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांनी प्रदर्शनातील सर्व स्टॉल्सला भेट देऊन करण्यात आली. विविध सामाजिक व पर्यावरणीय विषयांवर आधारित या महोत्सवाने उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमात फॅक्टरी मॅनेजर राहुल बोरसे यांनी ‘किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवा’च्या उद्दिष्टांची ओळख करून दिली आणि पर्यावरण संवर्धनासाठी कंपनी करत असलेल्या कार्याबद्दल माहिती दिली. त्यानंतर घतखऋऋ डायरेक्ट विरेंद्र चित्राव यांनी फेस्टिवलची थीम सकस अन्न, समृद्ध निसर्ग आणि आरोग्यपूर्ण समाज यावर प्रकाश टाकत आरोग्य जपण्याचे महत्त्व सांगितले.
यावेळी ‘किर्लोस्कर वसुंधरा मित्र पुरस्कार’ ‘नाशिक प्लॉगर्स संस्थे’ला प्रदान करण्यात आला. ‘नाशिक प्लॉगर्स संस्थे’चे प्रतिनिधी अद्वैत शुक्ल यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “संस्थेने आतापर्यंत १८ टन कचरा गोळा केला असून नऊ हजारहून अधिक स्वयंसेवक या मोहिमेत सहभागी झाले आहेत.” त्यांनी प्लास्टिकच्या दुष्परिणामांवर चर्चा करत सर्वांना स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात संजय पाटील (Cheif Thematic Programme executive B- IF ) यांनी मिल्लेट्स(तृणधान्ये) आहारात समाविष्ट करण्याचे महत्त्व सांगितले, तर किर्लोस्कर ऑईल इंजिन्स कंपनी नाशिकचे प्लांट हेड रमेश चव्हाण यांनी प्लास्टिकमुक्त जीवनशैलीचा अवलंब करण्यासाठी तसेच आपल्या मागील पिढीचे जेवणातील असलेले विविध प्रकार व आता असलेले ताटातले विशिष्ट प्रकार व त्यातील सकस अन्नातील तफावत अधोरेखित करून, इतर प्रेरणादायक उदाहरणे दिली. कार्यक्रमाची सांगता पर्यावरण संरक्षणाच्या उद्दिष्टांसाठी सर्वांच्या योगदानाचे आवाहन करून करण्यात आली. ‘किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’ने नाशिककरांमध्ये ‘पर्यावरण विषयक जागृती’ निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
सदर महोत्सव यशस्वी करण्यासाठी शहरातील विविध महाविद्यालये, प्राचार्य, शिक्षक वर्ग, स्वयंसेवी संस्था, पत्रकार यांचाही मोलाचा सहभाग लाभला. ‘किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लिमिटेड’ नाशिक प्लान्टचे सर्व सेक्शन हेड आणि कमिटीचे विशेष आभार मानण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानी परदेशी यांनी, तर आभार प्रदर्शन प्रवीण बोडके यांनी केले.